आंतरराज्यीय मोबाईल टॉवर बॅटरी चोर पोलिसांच्या पंज्यात

110

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १२ : जिल्ह्यातील पोलिस पथकाने धानोरा व मुरूमगाव येथे दाखल मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणत विविध राज्यांतील आतंरराज्यीय मोबाईल बॅटरी चोर पकडले आहेत. त्यांच्याकडून चारचाकी, दुचाकी वाहन व मोबाईल टॉवरच्या बॅटरींसह एकूण २७ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस पथकाने तपासादरम्यान बालोद (छत्तीसगड) मार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता एका संशयीत पीकअप वाहनाच्या क्रमांकावरुन वाहन मालकाचे नाव व मोबाईल क्रमांक मिळाल्याने या वाहन मालकावर पाळत ठेवली. यानंतर ३० नोव्हेंबर २०२५ रोजी हा वाहन मालक येरकड हद्दीत संशयीतरित्या फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा, सावरगाव, येरकड व मुरूमगाव अशा चार ठिकाणी रात्रकालीन सापळा करून संशयित वाहन मालकावर पाळत ठेवली असता, येरकड हद्दीतील मोवाड येथुन ४ आंतरराज्यीय आरोपी साबीर रमजान मलिक ( वय ३९) रा. मोहल्ला कल्याणसिंग मवाना (उ.प्र.), अशोक हरीसींग मोर्या ( वय ४९) रा. न्यू सरेंद्रनगर थट्टीपूर, ग्वालीयर (म.प्र.), जितेंद्र कुमार लक्समीचंद राठोड ( वय २६) रा. नेताजीनगर, जाजगीर ता. जि. जाजगरी (छत्तीसगडज) व नामदेव रामा कांबळे ( वय ४३) रा. नेताजीनगर, एम.पी. नगर, भोपाल (म.प्र.) यांना ताब्यात घेण्यात आले. यासोबतच त्यांच्याकडून १ पिकअप चारचाकी वाहन अंदाजे किंमत पाच लाख रुपये, १ दूचाकी वाहन अंदाजे किंमत ५० हजार रुपये, ८ नग बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या बॅटरी अंदाजे किंमत ८ लाख रुपये, ४ मोबाईल फोन अंदाजे किंमत २० हजार रुपये, कटर व इतर साहित्य अंदाजे किंमत १ हजार रुपये जप्त करण्यात आले. या आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता, आरोपींनी सावरगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील २ टॉवरच्या १६ बॅटरी, मुरूमगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील २ टॉवरच्या १६ बॅटरी अशा एकूण ३२ बॅटरींची चोरी केल्याचे कबूल केले. या बॅटरी दिल्ली येथे विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ३२ बॅट­रींचा पोलिस पथकाने दिल्ली येथे शोध घेतला असता, दिल्ली येथील लीनेज कंपनीच्या एकूण १३ बॅटरी अंदाजे किंमत १४ लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिस दलास यश आले. आरोपींकडून एकूण १३ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा व दिल्ली येथून १४ लाख रुपये किंमतीचा असा एकूण २७ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यालयालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

————————————