“गडचिरोलीच्या विकासाचा ब्लूप्रिंट “अपघात, पाणी, भूमिगत गटार, रस्ते, शहरीकरण… विधानसभेत डॉ. नरोटेंनी मांडल्या गडचिरोलीच्या ज्वलंत समस्या”

187
  1. ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांनी जिल्ह्यातील समस्या प्रभावीपणे मांडल्या. ते काय बोलले…….संपूर्ण भाषण वाचाच…

 

अध्यक्ष महोदय,

 

१२ तास ४२ मिनिटं ५९ सेकंदांनी बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद!

नगरविकास विभागाच्या मागण्यांवर बोलण्यासाठी उभा आहे. गडचिरोली जिल्ह्याचे औद्योगिकीकरण आणि शहरीकरण खुप मोठ्या वेगाने होत आहे. त्याच बरोबर शहरात अपघाताचे प्रमाणसुद्धा वेगाने वाढत चालले आहे. शहरात मोठे ट्रक आणि जड वाहने मोठ्या प्रमाणात येत आहेत. सकाळी ८. ३० वाजता आमच्या शाळेत नवोदयमध्ये शिकलेल्या आमच्या ताई ममता बांबोळे यांचे अपघाती निधन झाले. एका सिमेंट ट्रकच्या खाली येऊन त्यांचा प्राण गेला. हा धोरणात्मक विषय असतानासुद्धा मी तुम्हाला अशी विनंती करतो की, सकाळचा वेळ जवळपास ७ ते ११ वाजता व संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत मोठे ट्रक, अवजड वाहनांना निर्बंध घालण्यात यावे. गडचिरोली शहरात एक सर्व्हिस रोड, सायकलिंग ट्रॅक, जाॅगिंग ट्रॅक यासाठी २०० कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून द्यावा.

सोबतच गडचिरोलीत आउटर रिंग रोडसाठी निधी मंजूर करावा, राष्ट्रीय महामार्गांवर मोकाट जनावरे आणि श्वान बसलेले असतात त्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोकाट जनावरांना ठेवण्यासाठी गोशाळा आणि मोकाट कुत्र्यांसाठी डाॅग शेल्टर सेंटर निर्मितीसाठी ५० ते ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा.

गडचिरोली नगर परीषद ही ब वर्ग नगर परीषद असून मुख्यालयाच्या ठिकाणी असल्यामुळे यापूर्वीची भूमिगत गटार योजना टप्पा – १ अपुरी पडत आहे. शहरीकरण झपाट्याने होत असल्यामुळे संपूर्ण शहर भूमिगत गटार योजनेने जोडण्याकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत टप्पा – २ मंजूर करावा, त्यासाठी ११५ कोटींची तरतूद करण्यात यावी. शहर झपाट्याने वाढत आहे.

चामोर्शी मार्ग, धानोरा मार्गावर पुढे गेले की सगळा जंगलव्याप्त परीसर आहे. नागपूरकडे आरमोरी मार्गावर गेल्यानंतर कठानी नदी लागते. त्यामुळे शहरात हाॅरीझंटल स्पेसेस खुप कमी आहेत. आपल्याला गडचिरोली शहराचा विकास करायचा असेल तर व्हर्टिकल स्पेसेसकडे जाण्याची खुप गरज आहे. त्यासाठी फर्स्ट फ्लोअर, सेकंट फ्लोअरला जे ओव्हरहेड केबल्स आहेत ते ओव्हरहेड केबल्स आता अंडरग्राऊंड करण्याची खुप गरज आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांचा निधी द्यावा. गडचिरोली शहराच्या आजुबाजुला काही ग्रामपंचायती आहेत. काहींचे भविष्यात नगर परीषदेत समायोजन करण्यात येईल. ते ब वर्गातून अ वर्गात येतील, त्यासाठी या चार वर्षांमध्ये जवळपास २१ कोटींची इमारत मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ५ कोटी देण्यात आले आहेत. उर्वरीत १६ कोटी तुम्ही नगर परीषदेला द्याल, अशी विनंती करतो.

शहराच्या मध्यभागी एक मामा तलाव आहे. त्यातून वेस्ट वेअर निघतो. १२ तास थांबल्यानंतर फक्त १२ मिनिटं तरी बोलू द्या. वेस्ट वेअरमधून निघणारे पाणी शहरात जाते. गणेशनगर, रेव्हेन्यू काॅलनी, आयटीआय चौक यात हे पाणी जाते. नाला कच्चा असल्यामुळे पाणी पसरते व पूर परीस्थिती निर्माण होते. ही पूर परीस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दीड किमीचा नाला पूर्ण पक्का बांधण्यात यावा, त्याचे सिमेंटीकरण करावे, त्यासाठी १५० कोटींचा निधी देण्यात यावा.

चामोर्शी, धानोरा या गट क नगरपंचायती आहेत. येथे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाण्याची खुप टंचाई असते. या टंचाईच्या निवारणाकरिता येथे वाढीव पाणीपुरवठा योजना देण्यात यावी, सोबतच येथे पाणीपुरवठा विभागाचे मंत्रिमहोदय बसलेले आहेत त्यांना विनंती करतो की, आमच्या विधानसभेमध्ये १५ गावांची प्रादेशिक योजना कुरूड, विसापूर हे जवळपास तीन वर्षे झाली सुरू नव्हती, निधी अभावी या योजना रखडल्या आहेत. त्यांना कायमस्वरूपी निधी द्यावा.

गेल्या दोन वर्षात नगर परीषद, नगरपंचायतीत कार्यकारिणी नसल्यामुळे दोन वर्षांपासून घनकचरासाठी निधीची तरतूद केलेली नव्हती. त्यामुळे आपण जनरल फंडातून त्यांना घनकचरासाठी पैसे देतोय, १५ व्या वित्त आयोगात मागील दोन वर्षांपासून जे पैसे प्रलंबित आहेत ते देण्याची कृपा करावी.

जलजीवन मिशनअंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. त्याची चौकशी करून त्यांना चांगलं काम करण्याची विनंती करतो.

————————————