फुले वॉर्ड येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांचा व नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम उत्साहपूर्ण संपन्न।

194

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता . २७ : गडचिरोली शहरातील प्रभाग क्रं. १ येथिल फुले वॉर्ड, येथे आज दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच नवनिर्वाचित नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, गुड्डी मारभते, शिल्पा गव्हारे, शेखर आखाडे व निखिल चरडे यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी समाजसेवक मोतीरामजी वाढई प्रभाकर कोकोडे,विजय बारापात्रे यांची विशेष उपस्थिती होती.

 

कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी प्रभागातील तसेच गडचिरोली शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था व इतर नागरी समस्या मांडल्या. यावेळी नगराध्यक्ष मा. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांनी सर्व नागरिकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या.

 

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रणोतीताई म्हणाल्या, “जनतेने दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. प्रभाग क्रं. १ सह संपूर्ण गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रत्येक नागरिकाची समस्या ही आमचीच समस्या आहे. कोणतेही काम प्रलंबित राहू दिले जाणार नाही. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने प्रभागातील व शहरातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

 

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, पारदर्शक कारभार, प्रामाणिकपणा व लोकसहभागातून गडचिरोली शहराचा विकास साधला जाईल, तसेच नागरिकांनी आपल्या सूचना व समस्या निःसंकोचपणे मांडाव्यात, असे आवाहन केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमामुळे प्रभाग क्रं.१ तसेच संपूर्ण गडचिरोली शहरात सकारात्मक व उत्साही वातावरण निर्माण झाले.