गडचिरोली जिल्ह्यात ३ लाख कोटींचा गुंतवणूक आणणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

140

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २७ : जिल्ह्यात आम्ही ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणत आहोत. या गुंतवणुकीसाठी स्थानिक संसाधन महत्वाचे आहे. या गुंतवणुकीतून तब्बल ७५ हजार ते १ लाख नोकऱ्या तयार होतील. त्यासाठी गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रम तयार करत आहे. हे मनुष्यबळ उद्योगांना उपलब्ध व्हावे आणि स्थानिकांना उत्तम नोकरी मिळावी यासाठी विद्यापीठाची तंत्रज्ञान संस्था हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गडचिरोली जिल्ह्यात तंत्रकौशल्य शिक्षणाला चालना देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ व लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक–खासगी भागीदारीत अडपल्ली (गडचिरोली) येथे स्थापन झालेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार (ता. २७) करण्यात आले. या कार्यक्रमाला वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी खाणीला परवानगी दिली. या परिवर्तनात कंपनीचे बी. प्रभाकरन यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आम्ही गडचिरोलीला केवळ स्टिल हब नाही, तर ग्रीन स्टील हब करू. जल, जंगल, जमिनीचे रक्षण करून. जिल्ह्यात पाच कोटी वृक्ष लावणार आहोत. त्यापैकी ४० लाख वृक्षारोपण झाले आहेत. शिवाय जिल्ह्यात विमानतळासाठी तीन जागांचे प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी एक जागा निश्चित करून जिल्ह्यात विमानतळही लवकरच तयार होईल. तसेच गडचिरोलीला गेट वे आॅफ साऊथ इंडिया बनवणार, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकात विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बोकारे यांनी सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांचे आभार मानले. कार्यक्रमात दुबई येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये पॅरा आर्चरी स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदक पटकावणारी गडचिरोली जिल्ह्याची दिव्यांग खेळाडू श्वेता कोवे हिचा सत्कार करण्यात आला. गडचिरोली पोलिसांना ३४ वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. गडचिरोली पोलिस विभागाच्या वाढीव विश्रामगृहाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर, आमदार डॉ. मिलिंद नरोटे नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

—————————–