ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली प्रतिनिधी, ता. १९ : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे ‘अखंड न्यायदर्पण’ या वृत्तपत्राचे विमोचन मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी ‘अखंड न्यायदर्पण’ या वृत्तपत्राच्या प्रकाशनाबद्दल मुख्यसंपादक सचिनगुरुजी मेश्राम, संपादक प्रा.श्रीमंत सुरपाम व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. पत्रकारिता ही समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून, सत्य, न्याय व लोकहित जपणारी पत्रकारिता समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘अखंड न्यायदर्पण’ हे वृत्तपत्र समाजात सकारात्मक विचार, न्याय भूमिका आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करेल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी या वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, ‘अखंड न्यायदर्पण’ वृत्तपत्राचे संपादक प्रा.श्रीमंत सुरपाम, कैलाश शर्मा यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यसंपादक सचिन गुरुजी मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजात न्याय, सत्य आणि लोकशाही मूल्ये दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.










