Home Gadchiroli आपण नेताजींना विसरलो आहोत का?

आपण नेताजींना विसरलो आहोत का?

48

लहानपणी शाळेत साजरे होणारे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचे कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी एखाद्या सणासारखेच असायचे. त्या दिवशी वेगळीच उत्सुकता, वेगळाच आनंद असायचा. झेंडा वंदन झालं की मास्तरांच्या मागे मागे आम्ही लहान-मोठी सगळी मुलं एकत्र उभी राहून जोरजोरात जयघोष द्यायचो —

भारत माता की जय!

महात्मा गांधी की जय!

बाबासाहेब भीमराव आंबेडकर की जय!

पंडित नेहरू की जय!

आणि आवर्जून —

नेताजी सुभाषचंद्र बोस की जय!

तो उत्साह, तो आवाज, ती ऊर्जा आजही आठवणीत ताजी आहे.

मात्र काळ बदलला.

लग्नानंतर माझं राज्य बदललं, शहर बदललं, परिसर बदलला. आयुष्य पुढे सरकलं. पण आजही मी स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिनाचे कार्यक्रम आवर्जून पाहते, सहभागी होते. झेंडा वंदन होते, देशभक्तीपर घोषणा दिल्या जातात, वातावरण भारावून टाकणारं असतं.

पण दरवर्षी, त्या क्षणी मी नकळत कान लावून ऐकते —

कुठेतरी, कोणीतरी

“नेताजी सुभाषचंद्र बोस की जय”

असं म्हणेल का?

पण नाही…

तो नारा ऐकू येत नाही.

आणि तेव्हाच मनात एक प्रश्न उभा राहतो —

खरंच आपण देशातील लोक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विसरलो आहोत का?

जेव्हा जेव्हा १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीचे कार्यक्रम पाहते, तेव्हा हा प्रश्न मनाला सतत बोचत राहतो. प्रत्येक मंचावर अनेक घोषणा दिल्या जातात, अनेक नेत्यांची नावे आदराने घेतली जातात. मात्र एक नाव — जे स्वातंत्र्यलढ्यात ज्वालासारखे उभे राहिले — ते नाव अनेकदा ऐकू येत नाही.

ज्यांनी ठामपणे सांगितले होते,

“तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन!”

ज्यांनी स्वातंत्र्याची लढाई केवळ भाषणांपुरती मर्यादित ठेवली नाही, तर ती रणांगणापर्यंत नेली. ज्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, ज्यांनी परदेशी भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला, ज्यांनी ब्रिटिश सत्तेला थेट आणि निर्भीड आव्हान दिले — तेच नेताजी आज आपल्या घोषणांत का दिसत नाहीत?

आज १५ ऑगस्ट असो किंवा २६ जानेवारी —

“भारत माता की जय” या घोषणा घुमतात,

पण

“नेताजी सुभाषचंद्र बोस की जय”

हा नारा मात्र का ऐकू येत नाही?

स्वातंत्र्य केवळ काही निवडक नावांचाच वारसा आहे का?

नेताजींचे योगदान फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरतेच मर्यादित राहिले आहे का?

नेताजींनी पाहिलेलं स्वप्न — एक स्वतंत्र, आत्मनिर्भर आणि सक्षम भारत — आजही आपल्याला योग्य दिशा दाखवतं. त्यांचे विचार आजही तितकेच सुसंगत, तितकेच प्रेरणादायी आहेत.

आज गरज आहे ती फक्त झेंडा फडकावण्याची नाही, तर प्रत्येकाच्या हृदयात नेताजींना पुन्हा जिवंत करण्याची आहे. त्यांच्या विचारांना, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या धैर्याला स्मरणात ठेवण्याची आहे.

चला, आज आपण एक संकल्प घेऊया —

आपल्या महान नायकांना आपण कधीही विसरणार नाही.

त्यांचे विचार कधीही मरणार नाहीत.

आणि अभिमानाने, संपूर्ण आदराने चला पुन्हा एकदा म्हणूया —

“नेताजी सुभाषचंद्र बोस अमर रहें!”

“जय हिंद! जय नेताजी!”