ग्लोबल गडचिरोली न्यूज,
भामरागड, ता. १५ (प्रतिनिधी) – भामरागड तालुका येथील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त पट्ट्यातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धोंडाराज, इरपणार, प्ररायणार आणि पेनगुंडा या गावांसह परिसरातील नागरिकांनी मुख्य नाल्यावर तातडीने पुलाची उभारणी करण्याची जोरदार मागणी केली आहे.राष्ट्रीय मानवाधिकार संघटना चे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खूणे यांनी नुकताच या भागाचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधताना नागरिकांनी पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यामुळे होणाऱ्या गंभीर हालअपेष्टांची माहिती दिली.१० ते १२ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो .तालुक्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी मधोमध असलेला मोठा नाला ओलांडणे अनिवार्य आहे. मात्र पावसाळ्यात हा नाला धोकादायक पातळीवर वाहत असल्याने सुमारे १० ते १२ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो.दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होतो“पूल नसल्यामुळे पावसाळ्यात आम्हाला अक्षरशः बेटासारखे राहावे लागते,” अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुलासाठीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला. नाल्यावर तातडीने पुलाला मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. डॉ. खूणे यांनी नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या अतिदुर्गम व संवेदनशील भागात पायाभूत सुविधा उभारण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून, प्रशासन यावर कितपत तत्परतेने निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










