ग्लोबल गडचिरोली न्यूज,
कोन्सारी, ता. १८ : लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी आणि लॉयड्स राज विद्या निकेतन (एलआरव्हीएन) शाळेच्या खेळाडूंनी अलीकडे पार पडलेल्या राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत, अनेक पदकांची कमाई केली आहे. Brahmapuri Sports Festival २०२६ अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा तसेच गडचिरोली येथील जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप पाडली.
चंद्रपूर येथे Brahmapuri Sports Association तर्फे आयोजित स्पर्धेत अंडर-१८ मुलींच्या गटात लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीची मोनिका मडावी हिने लांब उडीमध्ये सुवर्णपदक आणि १०० मीटर धावण्यात रौप्यपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले.एलआरव्हीएन शाळेची विद्यार्थिनी भाग्यश्री मुलमा हिने अंडर-१४ मुलींच्या गटात गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक आणि १०० मीटर धावण्यात कांस्यपदक जिंकत आपली बहुगुणी क्षमता सिद्ध केली.गडचिरोली येथील पायलट प्रोजेक्ट आर्चरी सेंटरमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेतही लॉयड्सच्या खेळाडूंनी यशाची परंपरा कायम राखली. अंडर-१५, अंडर-१३ आणि अंडर-१० गटांमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पदके पटकावली. विशेष म्हणजे शालेय गटातील सर्व पदक विजेते एलआरव्हीएन शाळेचे विद्यार्थी होते.
अंडर-१५ मुलींच्या गटात पल्लवी सुरेश गोडसेलवार हिने सुवर्णपदक तर पूर्वी विकास देबनाथ हिने रौप्यपदक जिंकले. अंडर-१५ मुलांच्या गटात सागर सुब्रत सरकार याने सुवर्णपदक पटकावले. अंडर-१३ गटात उज्ज्वल दिनेश दास याने कांस्यपदक मिळवले, तर अंडर-१० गटात अनिश बुधन सिंकू याने रौप्यपदक जिंकले.
कोन्सारी येथील लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या सौरभ राऊत याने अंडर-१५ मुलांच्या (डिस्टन्स व इंडिव्हिज्युअल) गटात कांस्यपदक मिळवले. तसेच गौरी गावतुरे हिने अंडर-१५ मुलींच्या गटात डिस्टन्स प्रकारात द्वितीय आणि इंडिव्हिज्युअल प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला.शिस्तबद्ध प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षित वातावरण या मजबूत क्रीडा पायाभूत व्यवस्थेमुळे लॉयड्सचे खेळाडू सातत्याने यश संपादन करत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लॉयड्सकडून क्रीडा विकासासाठी सातत्याने गुंतवणूक केली जात आहे.
Lloyds Metals and Energy Limited चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली स्थानिक युवकांसाठी अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या सुविधांचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत असून लॉयड्सचे खेळाडू जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहेत.










