ग्लोबल गडचिरोली न्यूज
मार्कंडादेव, ता. १८ : चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे यंदाच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान अंतर्गत जय संतोषी मॉं मंदिर, भगवान मार्कंडेय शिव मंदिर आणि गुरु मॉं छायादेवी समाधी स्थळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता मठाधिपती आचार्यंश्री श्रीमंत संतोष सौ. छायादेवी छबिलदास नारायण अर्जुन पोच्चय्या सुरपाम यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा पार पडली. दुधाभिषेक, जलाभिषेक आणि मंत्रोच्चारांच्या गजरात मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. धार्मिक विधींमध्ये संस्थेच्या सचिव अल्का सुरपाम, उपाध्यक्ष रत्नमाला सुरपाम, सहसचिव छबिलदास सुरपाम तसेच कोषाध्यक्ष वर्षा भाजीपाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उत्सवाच्या निमित्ताने १५ फेब्रुवारी रोजी उपवासाच्या भाविकांसाठी साबुदाणा खिचडी प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या दोन दिवसांत सुमारे ४० हजारांहून अधिक श्रद्धाळूंनी मंदिरात दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला.
दिवसभर मंदिर परिसरात भजन, कीर्तन, मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आयोजन समितीने पिण्याच्या पाण्याची सोय, रांगेचे नियोजन, तसेच सुरक्षा व्यवस्था उत्तम प्रकारे केली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांना कोणतीही अडचण भासली नाही.
स्थानिक नागरिक व भाविकांनी संस्थेच्या नियोजनाचे कौतुक करत अशा धार्मिक उपक्रमांमुळे परिसरातील आध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली. महाशिवरात्री उत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व भक्तगण, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले.










