विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे काम सुरूळीतच : कुलगुरू डाॅ. प्रशांत बोकारे

63

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या मूल्यांकनासंदर्भात काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित बातमीमुळे अनेक गैरसमज निर्माण होत आहेत. मात्र त्यात काहीच तथ्य नसून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे काम सुरूळीतच आहे, अशी माहिती कुलगुरू डाॅ. प्रशांत बोकारे यांनी गुरुवार (ता. १२) पत्रकार परीषदेत दिली.

विद्यापीठात आयोजित या पत्रकार परीषदेत कुलगुरू डाॅ. बोकारे म्हणाले की, परीक्षेचे काम सुरवतीपासूनच अतिशय सुरळीत सुरू आहे. विद्यापीठातील सेवारत अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्याप्रति प्रामाणिक राहून विद्यापीठ प्रशासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यातच काही परीक्षा मूल्यांकन केंद्रांवर अनियमीतता सुरू असल्याची चर्चा विद्यापीठ प्रशासनाकडे आली. चर्चेनुसार भविष्यात कोणताही धोका अथवा अनियमितता होऊ नये, याकरिता विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली. गोंडवाना विद्यापीठ आपल्या कार्यकुशलतेने वेळेत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेहमीच पुढे असते. याची दखल राज्य शासनानेसुद्धा घेतली आहे. असे असतानाही विद्यापीठाबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. यापूर्वी अनेकदा खोट्या तक्रारी करणे, तक्रारीवर तक्रारदाराचा पत्ता चुकीचा टाकून दिशाभूल करणे आदी प्रकार झाले आहेत. तरीही यावेळी सुरू असलेल्या चर्चेची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी काळजी घेतलेली आहे . त्यानंतर चौकशी केली. मात्र चर्चेनुसार कोणतीही माहिती मिळाली नाही. तरीही विद्यापीठ प्रशासनाने चर्चेची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतरत्र हलवून परीक्षेचे कामकाज सुरळीत केले आहे. नियमानुसार मूल्यांकन, परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. विद्यापीठातील पुर्नमूल्यांकन विभाग हा अत्यंत गोपनीय स्वरूपाचा विभाग आहे. दररोज कामकाज पूर्ण झाल्यानंतर संबंधित कक्ष नियमानुसार सील करण्यात येते व पुढील दिवशी कामकाज सुरू करताना अधिकृतरीत्या सील उघडण्यात येते. ही नियमित प्रशासकीय व सुरक्षा प्रक्रिया आहे. या नियमित प्रक्रियेला ‘गंभीर प्रकार’ व ‘संशय’ असा रंग देऊन उल्लेख केल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे, त्यांच्याकडून काम करून घेणे किंवा त्यांची सेवा समाप्त करणे हा पूर्णतः विद्यापीठाचा वैधानिक व प्रशासकीय अधिकार आहे. त्या अनुषंगाने कोणताही निर्णय घेतल्यास तो नियमबद्ध अधिकाराअंतर्गत घेतला जातो. अशा निर्णयाचा कथित ‘गुणवाढीच्या प्रकाराशी’ संबंध जोडणे हे पूर्णतः निराधार आहे, असेही ते म्हणाले. विद्यापीठ हा समाजाचाच घटक असून विद्यापीठाची प्रतिष्ठा जपणे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डाॅ. बोकारे यांनी केले. पत्रकार परीषदेला प्र- कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे, कुलसचिव डाॅ. अनिल हिरेखन उपस्थित होते.

—————————–