राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी वरिष्ठ खेळाडूंची निवड; गडचिरोलीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

269

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. १३ : गडचिरोली जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत गडचिरोली येथील अंतरंग योगा क्लब व पतंजली योग समिती, गडचिरोली यांच्या वरिष्ठ वयोगटातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

ही राज्यस्तरीय योगासन स्पर्धा १४ व १५ मार्च २०२६ रोजी संभाजीनगर येथे महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत ४५ ते ५५ वर्षे महिला गटात पतंजली महिला योग समितीच्या सौ. वर्षाताई प्रवीण मोडक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अंतरंग योगा क्लबच्या सौ. गीताताई राजेंद्र मुळे यांनी द्वितीय, सौ. आशाताई बबन मडावी यांनी तृतीय तर पतंजली महिला योग समितीच्या सौ. वर्षाताई वासुदेव वट्टे यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला.

तसेच ५५ ते ६५ वर्षे पुरुष गटात पतंजली योग समितीचे श्री. प्रवीण राजेश्वर मोडक यांनी प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

या सर्व खेळाडूंनी अंतरंग योगा क्लबचे योग प्रशिक्षक डॉ. अनिल एन. निकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित योगासनाचा सराव केला असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाल्याचे सांगितले जात आहे.

खेळाडूंच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.