गॅस सिलिंडर काळाबाजाराविरोधात जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम; ११२ ठिकाणी तपासण्या, ४ सिलिंडर जप्त

132

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. १४ : घरगुती गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धडक तपासणी मोहीम राबवली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात एकूण ११२ ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या.

या कारवाईत प्रामुख्याने व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर व अनधिकृत साठवणूक होत असल्याची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

तालुकानिहाय कारवाई :

या मोहिमेत सर्वाधिक तपासण्या गडचिरोली (३०) व धानोरा (२२) तालुक्यांत करण्यात आल्या. तपासणीदरम्यान खालीलप्रमाणे गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.

गडचिरोली तालुका : २ गॅस सिलिंडर जप्त (मूल्य सुमारे ₹६,०००)

चामोर्शी तालुका : १ गॅस सिलिंडर जप्त (मूल्य सुमारे ₹३,०००)

मुलचेरा तालुका : १ गॅस सिलिंडर जप्त (मूल्य सुमारे ₹३,७६०)

या कारवाईत जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण ४ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून जप्त मालाची अंदाजे किंमत ₹१२,७६० इतकी आहे.

फौजदारी गुन्ह्यांची प्रक्रिया सुरू :

अवैध साठवणूक व वापर आढळलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुलचेरा येथे १ गुन्हा दाखल करण्यात आला असून गडचिरोली व चामोर्शी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अवैध साठवणूक किंवा व्यावसायिक वापर आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यात अशी तपासणी मोहीम पुढेही सातत्याने सुरू ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.