भरधाव टिप्परने दिली पोलिसांच्या बुलेटप्रूफ वाहनाला जोरदार धडक

256

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १५ : येथील गडचिरोली-धानोरा मार्गावर आरमोरीच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव अवजड टिप्पर ट्रकने पोलिस विभागाच्या सी-६० पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने वाहनातील जवानांचा जीव थोडक्यात बचावला असून मोठी दुर्घटना टळली.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली ते धानोरा मार्गावर सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या ठिकाणी गिट्टी खाली करून संबंधित टिप्पर वाहन पाचगाव (नागपूर) कडे परत जात होते. दरम्यान अचानक समोर आलेल्या दुचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने टिप्पर उजव्या बाजूला वळवला. त्याच वेळी समोरून येत असलेल्या सी-६० पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला त्याची जोरदार धडक बसली. धडक देणाऱ्या टिप्पर वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. टिप्परने बुलेटप्रूफ वाहनाच्या मागील बाजूला, चालकाच्या बाजूच्या मागच्या चाकाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे बुलेटप्रूफ वाहनाचा टायर पूर्णपणे खराब झाला असून टायरची लोखंडी डिस्कसुद्धा वाकून गेल्याचे दिसून आले. या धडकेमुळे बुलेटप्रूफ वाहनाचा मागील टायर फुटल्याने वाहन काही क्षण अनियंत्रित झाले आणि पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या खालच्या भागात उतरले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे आणि वाहन बुलेटप्रूफ असल्यामुळे सर्व जवान सुरक्षित बचावले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

———————————–