ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १९ : नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अतिदुर्गम बंगाडी येथे अवघ्या २४ तासांत नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. हे केंद्र १००० सी-६० कमांडो, १८ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलिस अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांच्या मदतीने अवघ्या २४ तासांत उभारण्यात आले आहे.
सन-२०२३ पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील हे ११वे नवीन पोलिस मदत केंद्र आहे. नवीन पोलिस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे नागरिकांपर्यंत सुरक्षा आणि विकास पोहचणे शक्य होणार असून येथील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागणार आहे. पोलिस मदत केंद्रात वायफाय सुविधा, १५ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, ८ सँन्ड मोर्चा आदी सुविधा आहेत. पोलिस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करून पोलिस मदत केंद्र, बंगाडी हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना साड्या, पुरुषांना धोतर, ब्लॅकेट, स्वयंपाक भांड्यांचा संच, बकेट, मच्छरदानी, युवकांना टी-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल आदी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात राष्ट्रीय महामार्ग, पूल, मोबाईल टॉवर तसेच गुंडेनूर नाल्याच्या बांधकामास सुरक्षा मिळणार असून या भागातील विकासकामांना गती मिळणार आहे. नवीन पोलीस मदत केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक ( गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, भामरागडचे विभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, बंगाडी पोलिस मदत केंद्राचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अशोक पुयाड, इतर अधिकारी व पोलिस अंमलदार उपस्थित होते.
————————————–










