गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

52

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कृतीशील जोपासना आवश्यक – कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे

गडचिरोली (Gadchiroli) दि.14: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, अर्थतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ, तत्वचिंतक यासह अनेक बिरुदावलीने जगभर गौरविले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखंड परिश्रम आणि त्यांची ज्ञानसाधना याची आपण कधीच बरोबरी करु शकणार नाही. परंतु आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी बनायचा असेल तर, बाबासाहेबांचा एक तरी गुण आत्मसात करुन त्याची अविरत कृतीशील जोपासना करणे आवश्यक असल्याचे मत, कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांनी व्यक्त केले.
गोंडवाना विद्यापीठामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

सुरुवातीला कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. धनराज पाटील, न.न.व.सा.चे संचालक प्रो.मनीष उत्तरवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे सहसमन्वयक रोहित बापू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आणि विचारांचा जगभरामध्ये आजही गौरव केला जातो. बाबासाहेबांचे कार्य सशक्त लोकशाही समाज निर्मितीसाठी सदैव दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून त्यांच्या विचारांची कास धरणे आणि त्यांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यामध्ये योगदान देणे हेच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल.

चिमुकल्याने जिंकली उपस्थितांची मने!

विद्यापीठातील कर्मचारी प्रशांत पुनवटकर यांचे चिरंजीव अरहत याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिनव पध्दतीने गोड आवाजात मनोगत व्यक्त करुन उपस्थितांची मने जिंकली. कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांनी त्याला बक्षीस देऊन त्याच्या वक्तृत्वशैलीचे कौतुक केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे सहसमन्वयक रोहित बापू कांबळे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी विविध अध्यासनांचे समन्वयक डॉ. अनिरुध्द गचके, डॉ. विनायक शिंदे, डॉ. प्रमोद जावरे, डॉ. विकास चित्ते, प्रा. संदीप कागे, अनंता गावंडे, डॉ. धैर्यशील खामकर, डॉ. सरफराज अन्सारी तर शिक्षकेत्तर कर्मचारी प्रशांत पुनवटकर, मनोज जाधव, सुधीर मुसळे, सुरज गेडाम यांच्यासह अन्य कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यासनाचे सिध्दांत झाडे व निता कन्नाके यांनी परिश्रम घेतले.

 

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #आंबेडकरजयंती #आंबेडकर135 #महामानव
#गोंडवाना_विद्यापीठ #गडचिरोली #विद्यापीठ_कार्यक्रम #अभिवादन
#कुलगुरु_प्रशांत_बोकारे #आंबेडकर_विचार #संविधान #लोकशाही
#शिक्षण #प्रेरणा #सामाजिकजागरूकता #युवाशक्ती
#लहान_प्रतिभा #वक्तृत्व #भविष्याची_पिढी #प्रेरणादायी
#गडचिरोली_न्यूज #महाराष्ट्र_न्यूज #नंदिवेध #स्थानिक_बातम्या

———————————————————-