१,२७८ युवक-युवतींना नियुक्तीपत्रे
ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली (Gadchiroli), ता. १७ :गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आयोजित भव्य रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. अतिदुर्गम भागातील सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अभूतपूर्व ठरला. या कार्यक्रमात मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. विविध नामांकित कंपन्यांकडून एकूण १,२७८ युवक-युवतींना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी प्रभाव जवळजवळ कमी झाला असून, नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृह येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, फ्लिपकार्ट, डी-मार्ट, लॉयड्स अँड मेटल्स एनर्जी लिमिटेड यांसारख्या नामांकित कंपन्यांसह एकूण ३८ कंपन्यांनी सहभाग नोंदविला. रोजगार मेळाव्यासाठी ४,००० पेक्षा अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली होती, तर त्यापैकी सुमारे २,४०० उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित होते. निवड प्रक्रियेनंतर खालीलप्रमाणे उमेदवारांना संधी मिळाली: महिंद्रा अँड महिंद्रा – ३६७ , हिटाची(जळगाव) – १३४ ,फ्लिपकार्ट व डी-मार्ट–१२० ,टोयोटा,किर्लोस्कर – ३० ,निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक ₹१,८०,००० ते ₹३,६०,००० पर्यंतचे पॅकेज देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. आशिष जयस्वाल यांनी युवकांना मिळालेल्या संधीचा प्रामाणिकपणे उपयोग करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. तसेच स्पर्धेच्या युगात स्वतःमध्ये सतत सुधारणा करण्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वीही पोलीस दलाने विविध उपक्रमांतर्गत हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये सुरक्षा रक्षक (८७७), नर्सिंग असिस्टंट (१,२९२), हॉस्पिटॅलिटी (३९८), ऑटोमोबाईल (३७७), इलेक्ट्रिशियन (३१३), वेल्डिंग (३७०), वेब डेव्हलपर (९०), सॉफ्टवेअर डेव्हलपर (१२०) आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
याच कार्यक्रमादरम्यान माओवादी विरोधी अभियानासाठी प्राप्त ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण देखील करण्यात आले. यामध्ये ३ अत्याधुनिक सर्व्हेलियन्स व्हॅनचा समावेश आहे.

कार्यक्रमास आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे तसेच इतर मान्यवर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
#Gadchiroli
#ProjectUdaan
#RozgarMela
#EmploymentDrive
#JobFairIndia
#YouthEmployment
#SkillDevelopment
#MakeInIndia
#AtmanirbharBharat
#PoliceInitiative
#GadchiroliPolice
#NaxalFreeGadchiroli
#DevelopmentWorks
#CareerOpportunities
#JobsForYouth
#EmploymentNews
#SuccessStory
#RuralDevelopment
#EmpoweringYouth
#IndiaGrowth
————————————










