भाजप ४०० जागा सहज जिंकेल : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

114

 

गडचिरोली, ता. ९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री पीकविमा योजना, गरीबांना मोफत धान्य, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार, अशा अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. शिवाय कोरोना काळातही प्रचंड काम करून कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली जनकल्याणाची कामे बघता यंदा भाजप ४०० पार जागा सहज जिंकेल , असा विश्वास रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीयाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

९ एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ गडचिरोलीत दाखल झाल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परीषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसच्या भ्रष्टाचारावर प्रहार केला. ते प्रामाणिकपणे कार्य करत आहेत म्हणून जनता त्यांच्यासोबत आहे. खासदार अशोक नेते यांनी आपल्या खासदारकीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने विकासकामे केली असून जनता त्यांना पुन्हा संधी नक्की देईल, असेही ते म्हणाले. या पत्रकार परीषदेला महायुतीचे उमेदवार अशोक नेते, आमदार डाॅ. देवराव होळी, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अॅड. जनबंधू, प्रदीप आगलावे आदी उपस्थित होते.

——————————