कोणत्याच पक्षाला समर्थन न देण्याचा नक्षलवाद्यांचा फतवा

75

गडचिरोली, ता. १४ : लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांचे एक पत्रक व्हायरल झाले असून ‘कोणत्याच पक्षाला समर्थन देऊ नका…’ असे आवाहन या पत्रकात जनतेला करण्यात आले आहे.

भारत कम्युनिस्ट पार्टी (माओवादी ) दक्षिण सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता समता याने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशात नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयामुळे सामान्य जनता हैराण आहे. दहा वर्षांत ८ लाख लघुउद्योग बंद पडले. त्यामुळे दोन कोटी लोकांचा रोजगार हिरावला. सध्या महिन्याला १३ लाख बेरोजगारांची भर पडत आहे, तर दर दिवशी ३० शेतकरी बेरोजगारी- कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणालाच समर्थन देऊ नका, मतदानावर बहिष्कार घाला. शनिवार १३ एप्रिल रोजी जारी केलेल्या पत्रकातून भाजपसह सर्वच पक्षांवर नक्षलवाद्यांनी टीका केली आहे. सरकारच्या उदात्तीकरण व जागतिकीकरण धोरणामुळे देशावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. जागतिकीकरणाच्या माध्यमातून धनदांडग्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. छत्तीसगडचे हंसदेव जंगल अदानी ग्रुपच्या स्वाधीन केले. ३३ टक्के वनक्षेत्र हवे, पण देशात सध्या हे क्षेत्र २१ टक्केच उरले आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सरकार सत्तारुढ होताच कॉर्पोरेट क्षेत्राच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची गरज आहे. अयोध्या, काशी, द्वारका, मथूरा, उज्जैन, कांचीपुरम ही महत्त्वाची देवस्थाने ‘टुरीझम सेंटर’च्या नावाखाली कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा घाट घातला जात आहे. १५ वर्षांपर्यंत कॉर्पोरेट कंपन्यांकडून कुठलाही कर आकारू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस कॅम्प उघडले जात आहे. छत्तीसगड राज्यात २६ प्रकारची अनमोल खनिज संपत्ती आहे. ही संपत्ती कार्पोरेट कंपन्यांना देण्यासाठी आधी काॅंग्रेस सरकारने आणि मग भाजपने १५० करार केल्याचाही आरोप पत्रकात केला आहे. हे पत्रक छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांचे असल्याची माहिती मिळाली आहे.

——————————