मोदींचे हात बळकट करायला नेते यांना निवडून द्या : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

131

गडचिरोली, ता. १४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी रात्रंदिवस कार्य करत आहेत. त्यांना विरोधात असलेल्या काॅंग्रेससह इतर विरोधी पक्ष हरणारच आहेत. पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी अशोक नेते यांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  • धानोरा येथे १४ एप्रिल रोजी महायुतीचे अशोक नेते यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाच्या लोकांना गडचिरोलीचा उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी बाहेरून उमेदवार आणला आहे. आदिवासीचा गरीब मुलगा पंतप्रधान मोदींसोबत विकास करतो, हे त्यांना पाहवत नाही. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षात जे केले तो केवळ ट्रेलर आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये या भारताला एक आर्थिक महासत्ता ते बनवणार आहेत. भारताची गरिबी संपवणार आहेत, असेही ते म्हणाले. खासदारकी अनेकांच्या अंगात येते. ते मग्रुरीने वागतात. पण अशोक नेते दोनदा खासदार होऊनही नेहमी नम्र राहिले. जनतेची कायम सेवा करत आहेत. म्हणून त्यांना पुन्हा संधी द्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्रामस उमेदवार अशोक नेते, माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांनीही सभेला संबोधित केले. सभेला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • —————————————–