- गडचिरोली, ता. २५ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती असलेली पत्रके स्थानिक राजेश कॉम्प्युटर्स यांच्याकडे छापून माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल काॅंग्रेसमध्ये असताना उमेदवारी न मिळाल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी व डाॅ. नितीन कोडवते यांच्या विरोधात गडचिरोली शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
- इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे रहिवासीच नाहीत अशी खोटी माहिती असलेली पत्रके प्रकाशित करून प्रसारीत करण्यात आली होती. यासंदर्भात डाॅ. नामदेव किरसान यांनी निवडणुक अधिकारी यांच्याकडे कारवाई करण्यासंदर्भात तक्रार अर्ज सादर केला होता. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आचार संहिता पथकाने प्रकरणाची चौकशी करून हा प्रकार खरा असल्याचे निष्पन्न होताच नायब तहसीलदारांमार्फत गडचिरोली शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. खरेतर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातीलच आमगाव विधानसभेचे डाॅ. किरसान रहिवासी आहेत. पण त्यांच्याबद्दल पत्रकात खोटीच माहिती देण्यात आली होती. त्यावरून आचारसंहितेचा भंग झाला म्हणून निवडणुकीपूर्वी भाजपावासी झालेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी व डॉ. नितीन कोंडवते यांच्याविरुद्ध २४ एप्रिल रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ. उसेंडी व डॉ. कोडवते यांच्याविरुद्ध भादंवि १७१(ग ) (१)सह कलम लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ ते कलम १२३(४) उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाली असून या प्रकरणाचा तपास गडचिरोली शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मार्गोनवार करत आहेत.










