जय जय महाराष्ट्र माझा…

144

महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी आहे. इथे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक थोर मंडळींचा जन्म झाला. म्हणून मला महाराष्ट्रीयन असल्याचा प्रचंड अभिमान आहे. १ मे रोजी महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी लोक पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाख परिधान करतात आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा गौरव करतात. कारण- याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. साधारण ६४ वर्षांपूर्वी १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रासह गुजरात राज्याची स्थापनादेखील १ मे रोजी करण्यात आली होती. थोडं इतिहासात डोकावलं, तर असं लक्षात येतं की, १५० वर्षांपासून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेला आपला भारत देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण राज्यांची निर्मिती होणे अद्याप बाकी होते. मग भाषा आणि प्रदेशानुसार राज्यांच्या निर्मितीला सुरुवात झाली. मद्रास राज्यातील तेलुगू भाषिक भागांमध्ये एक शक्तिशाली आंदोलन झाले. त्यानंतर १९५३ मध्ये आंध्र राज्याच्या निर्मितीचा संपूर्ण देशभरात परिणाम झाला आणि राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती करण्यात आली. १९५६ मध्ये संसदेने राज्य पुनर्रचना कायदा संमत केला. या कायद्यामुळे भारतीय राज्यांच्या सीमा पुन्हा रेखाटण्यात आल्या. म्हणून १९५६ अंतर्गत देशात अनेक राज्ये निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमीळ भाषेच्या लोकांना तमिळनाडू राज्य मिळाले. मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. राज्य पुनर्रचना कायद्यान्वये मुंबई प्रांतासाठी नवीन सीमा तयार केल्या गेल्या होत्या. मुंबईच्या प्रांताच्या सीमा मराठवाडा, विदर्भ, सौराष्ट गुजरातपर्यंत विस्तारून नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे द्विभाषिक लोकांचा मुंबई प्रांतात समावेश होता. त्यानंतर मराठी भाषकांनी स्वतंत्र राज्याच्या मागणी केली. दुसरीकडे गुजराती भाषेतील लोकांनाही स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. त्यांनीही चळवळ सुरू केली. या आंदोलन व चळवळींचा परिणाम होऊन १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली. पण मुंबईसाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पेटला वाद होता. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मुंबई मिळविण्यासाठी हा वाद सुरू झाला. एकीकडे महाराष्ट्रीय लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग म्हणून हवा होता. कारण तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते, तर मुंबईच्या प्रगतीमध्ये गुजराती लोकांचा जास्त वाटा आहे, असे गुजरात राज्यातील लोकांचे मत होते. त्यामुळे त्यांना मुंबईचा समावेश आपल्या राज्यात असावा, असे वाटत होते. मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे, असे काहींचे मत होते. परंतु, संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला आणि मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे, असे काहींचे मत होते. परंतु, संयुक्त महाराष्ट्र चळवळीने मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. संयुक्त महाराष्ट्र समितीमार्फत १९५६ मध्ये मुंबईत एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे तब्बल १०६ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आजच्या दिवशी या वीर हुतात्यांचे स्मरण करून त्यांनाही आपण श्रद्धांजली अर्पण करायला हवी. या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला चालना मिळाली. मुंबई शहराच्या मध्यभागी असलेला हुतात्मा चौक या लढ्याचे प्रतीक आहे. या मोर्चानंतर १९५६ ते १९६० या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली. तत्कालीन कम्युनिस्ट आणि समाजवादी नेत्यांनी मुंबईसह महाराष्टाची चळवळ अधिक तीव्र केली. अखेर मुंबईचा समावेश महाराष्ट्र राज्यात करण्यात आला. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे आता महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत आहे. महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारे हे देशभक्तीपर गीत असून गाण्याचे मूळ बोल राजा बढे यांनी लिहिले, तर संगीत श्रीनिवास खळे यांनी दिले होते. हे गीत लोकगायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायले होते. मूळ गीत तीन कडव्यांचे आहे. तर राज्यगीत दोन कडव्यांचे आहे. १ मे महाराष्ट्रदिनी हे गीत ओठी येताच उर भरून येतो आणि आपण या पुरोगामी, समाजसुधारकांच्या, विरांच्या राज्याचे रहिवासी आहोत, याचा आकाशभर आनंद होतो. देशाच्या हृदयस्थानी असलेल्या या आपल्या महाराष्ट्रात एखाद्या सोनेरी कोंदणात हिरवा पाचू जडवावा तसा आपला गडचिरोली जिल्हा आहे. म्हणून देशासह महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या कोंदणातील पाचूसारख्या सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या आपल्या गडचिरोली जिल्ह्याचीही दशदिशांत प्रगती व्हावी, सर्वांना सुख, शांती, समृद्धी लाभावी हीच आई भवानी चरणी प्रार्थना !

– तिलोत्तमा हाजरा, मुख्य संपादक, ग्लोबल गडचिरोली पोर्टल