कोसळलेल्या विजेने घेतले दोघांचे प्राण, दोघे जखमी

201

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ६: जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे अनेक भागांत विजही कोसळत असून गुरुवार ६ जून रोजी सायंकाळी अचानक कोसळेल्या विजेमुळे दोघांचे प्राण गेले, तर दोघे गंभीर जखमी आहेत.

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै.) व तळोधी (मोकासा) परीसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळ व विजांच्या कडकटासह गारपीट झाली. यात वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

गुरूदास मणिराम गेडाम(वय ४२) रा.गोवर्धन कुनघाडा (रै.) यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी वैभव चौधरी यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. इतर गंभीर जखमींमध्ये नीलकंठ तरकडू भोयर, लेकाजी नैताम रा. तळोधी (मोकसा) यांचा समावेश आहे. कुनघाडा (रै.) परीसरातील कुनघाडा, तळोधी (मोकासा) परीसरात अचानक आलेल्या वादळामुळे राईस मिलसह घरांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. यावेळी गारपीट व वादळसह पाऊस झाला. त्यामुळे राईस मिल व अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. काहींच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांनाही समस्यांचा सामना करावा लागला. सध्या विजेचे कोसळण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुढील ३ तासांत गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी ४० -५० किमीपर्यंत) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.