गडचिरोली पोलिस, सीआरपीएफ दलाला शरण आला जहाल माओवादी

108

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. १० : गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ दलासमोर २ लाख रुपये बक्षिस असलेला जहाल माओवादी किशोर उर्फ मुकेश पेंटा कन्नाके (वय ३७) रा. नेलगुंडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली याने सोमवारी १० जून रोजी शरणागती पत्करली.

जहाल माओवादी किशोर उर्फ मुकेश पेंटा कन्नाके २०१४ मध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून (भामरागड दलम) मध्ये भरती होऊन २०१५पर्यंत कार्यरत होता. २०१५ मध्ये डीएकेएमएस (दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना) मध्ये अध्यक्ष पदावर पदोन्नती होऊन २०१८पर्यंत कार्यरत होता. २०१८ मध्ये आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) सदस्य म्हणून २०२२ पर्यंत कार्यरत होता. २०२२पासून भामरागड दलम सदस्य व आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) च्या अध्यक्ष पदावर पदोन्नती होऊन आत्मसमर्पण करतपर्यंत याच पदावर कार्यरत होता. या कार्यकाळात २०१७ मध्ये मौजा दरबा पहाडी जंगल परिसरात झालेली चकमक, २०२१ मध्ये मौजा कोपर्शी जंगल परिसरात झालेली चकमक व २०२२ मध्ये मौजा पेनगुंडा जंगल परिसरात झालेली चकमक अशा तीन चकमकींमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच २०१५ मध्ये मौजा मल्लमपड्डूर तलावाजवळील रोडवर झालेल्या एका निरपराध व्यक्तीचा खून, २०१८मध्ये मौजा गोंगवाडा टी-पॉइंट जवळ झालेल्या एका निरपराध महिलेचा खून, २०१९ मध्ये मौजा जूवी नाल्याजवळ झालेल्या एका निरपराध व्यक्तीचा खून व २०२३ मध्ये मौजा पेनगुंडा ते गोंगवाडाकडे जाणा­या कच्च्या रोडवर झालेल्या एका निरपराध व्यक्तीचा खून अशा चार खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. याशिवाय २०२१ मध्ये मौजा मरकनार ते मुरूमभूशी रोड जंगल परिसरात वाहनांची जाळपोळ, २०२२ मध्ये मौजा बोटनफुंडी ते विसामुंडी रोड जंगल परिसरात वाहनांची जाळपोळ, २०२२मध्ये मौजा पेनगुंडा रोड जंगल परिसरात जेसीबी व ट्रॅक्टर वाहनांची जाळपोळ, २०२३ मध्ये मौजा हिद्दुर गावाजवळ रोड कामावरील ४ (१ जेसीबी, ३ ट्रॅक्टर) वाहनांची जाळपोळ या चार जाळपोळ प्रकरणांतही त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२१ मध्ये मौजा कोठी ते कोठी टोला रोडवर माओवादी बॅनर व पत्रके लावण्यात व २०२३मध्ये मौजा नेलगुंडा जंगल परिसरात जमिनीत स्फोटके पुरून ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून त्याला एकूण ४ लाख ५० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे २०२२ ते २०२४ दरम्यान आतापर्यंत एकूण १५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र)अंकित गोयल, पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ जगदीश मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, कमांण्डट ३७ बटालियन सीआरपीएफ एम.एच. खोब्राागडे, पोलीस अधीक्षक, विशेष कृती दल नागपूर संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर ज्योत्स्ना मसराम, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलिस हवालदार प्रमोद पुरीसह सीआरपीएफ ३७ बटालियन बी-कंपनीने पार पाडली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे आवाहन…

विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.