प्रेम होते, पण घर जावई व्हायचे नव्हते, म्हणून युवकाची आत्महत्या

152

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली,ता.१० : अवघा २५ वर्षांचा नवतरूण प्रेमात पडला. त्याच्या घरचे आणि मुलीच्या घरचेही लग्नाला तयार होते. पण वधूपक्षाने एकच अट घातली की त्याने घरजावई म्हणून यावे. त्यासाठी त्याच्या घरचे तयार झाले. पण तो तयार नव्हता. आपले कितीही प्रेम असले, तरी घरजावई म्हणून जायचे नाही असे ठरवत त्याने आपल्या शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना धानोरा तालुक्यातील तोयागोंधी येथे रविवार ९ जून रोजी घडली असून सुधाकर महारू पोटावी (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे.

सविस्तर माहितीनुसार मृत सुधाकर पोटावीचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. पण तो घरजवाई बनून आला, तरच लग्न होईल, असा प्रस्ताव मुलीच्या घरच्यांकडून आला होता. त्यानुसार सुधाकरला त्याचे कुटुंबीय घरजावई म्हणून सुरसुंडी गावाजवळच्या शिवटोला येथे नेऊन देणार होते.परंतु त्याला घरजावई होणे पसंत नव्हते. घरजावई होऊन शिवटोल्याला जाण्याच्या आदल्या दिवशी रविवारी सुधाकर पोटावीने आपल्या शेतातून आंबे आणून घरी दिले. त्यानंतर दुपारी तो पुन्हा शेतामध्ये निघून गेला. सायंकाळी तोयागोंदी येथे वादळी पाऊस आल्याने सर्व लोक घरी आले. मात्र सायंकाळ झाली, तरी सुधाकर घरी आला नाही म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी कुटुंबातील सदस्य शेतात गेले असता तो शेतात मृतावस्थेत आढळून आला. त्याला धानोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांला मृत घोषीत केले. त्यानंतर सोमवार (ता. १०) सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह घरच्यांना सोपाविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास धानोरा पोलिस करत आहेत.

आदिवासींची प्राचीन परंपरा….

आदिवासी संस्कृतीत घरजावई होण्याची प्राचीन परंपरा आहे. इतर संस्कृतीत वरपक्ष हुंडा घेतो. पण आदिवासी समाजात वरपक्षाला वधूपक्षास हुंडा द्यावा लागतो. वरपक्ष हुंडा देण्यास सक्षम नसेल तर हुंड्याचे पैसे फिटेपर्यंत नवरदेव मुलाला आपल्या सासरी घरजावई होऊन राहावे लागते. ही अतिशय प्राचीन आणि आदिवासी समाजाच्या अंगवळणी पडलेली परंपरा आहे. त्यामुळे सुधाकर पोटावीने घरजावई व्हायचे नव्हते म्हणून आत्महत्या केली की, त्याच्या मृत्यूमागे इतर काही कारणे आहेत, असे प्रश्नही विचारले जात आहेत. आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान धानोरा पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.