ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. १२ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर सातत्याने सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे व निर्माणाधिन महामार्गाच्या कामामुळे पावसाळ्यात या मार्गावर मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गावरील दोन्ही बाजुंनी सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतूकीस प्रतिबंध करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय भाकरे यांनी निर्गमित केले आहेत.
त्यांच्या आदेशानुसार या महामार्गावर १९ जुनच्या मध्यरात्रीपासून ३१ आक्टोबर २०२४पर्यत जड वाहतुकीस मनाई करण्यात आली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर येणाऱ्या वाहनांकरिता सिरोंचा- मंचेरियाल- राजुरा- बल्लारशाह-चंद्रपूर-गडचिरोली पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा. तर आलापल्लीहून मंचेरियालमार्गे जाणाऱ्या वाहनांसाठी आलापल्ली- आष्टी- बल्लारपूर-मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा. आदेशाचे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहतुकदारावर भारतीय दंडसंहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. आपातकालीन सेवा, प्रवासी बसेस, पाणीपुरवठा, पोलिस, अन्न-औषध-पुरवठा, महावितरण, दूरसंचार, रस्ते दुरुस्ती व आरोग्य विभागासंदर्भातील वाहनांना हा आदेश लागू राहणार नाही.
—









