शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी केले विशाल धरणे आंदोलन

101

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने मानधनवाढीच्या मागणीकरिता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालय समोर गुरुवार १३ जून रोजी विशाल धरणे आंदोलन केले.

मासिक २५०० रुपये तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या हजारो शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विशाल धरणे व नारेबाजी निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर शिक्षणाधिकारी पवार, शालेय पोषण अधीक्षक बारेकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रमोद पाटील यांना स्मरण पत्र पाठविण्यात आले. दीड हजार रुपये वाढीचा जीआर शासनाने त्वरित काढावे म्हणून निवेदन देण्यात आले. वाढत्या महागाईनुसार शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतश्रेणी मिळेपर्यंत मासिक १५००० रुपये मानधन देण्यात यावे, चपराशी कम कुक पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करणे बंद करावे, त्यांच्या कामाशिवाय इतर कामे सांगू नये, सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी, सर्व शाळेत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात यावे, दरवर्षी करर नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर रुजू झाल्यापासून नियुक्ती पत्र देण्यात यावे, तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे, १२ महिन्यांचे मानधन देण्यात यावे, दिवाळी बोनस लागू करण्यात यावे, शाळा व शाळेचा सर्व परीसर झाडण्यास सांगू नये, दर महिन्याला मानधन व इंधन बिल कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य महासचिव विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव सचिन मोतकुलवार, जिल्हा संघटक शरीफ शेख, रूपाली हेडाऊ, सुनीता धाकडे, विलास समर्थ, कल्पना जांबेवार, अर्चना मडावी, मंदा मंडरे, मनाबाई वेळदा, प्रकाश सिंद्राम, मनीषा कोवे, वर्षा गुंफालवार यांनी केले. या आंदोलनात शेकडोच्या संख्येने शालेय पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते.

———————————-