विवाहित असतानाही घटस्फोटीताचे नाटक करून लैंगिक शोषण करणारा पोलिस शिपाई जेरबंद

408
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. २५ ; विवाहित असतानाही आपण पत्नीला घटस्फोट दिल्याचे खोटेच सांगून त्याने एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वारंवार तिच्या शरीराचा उपभोग घेतला. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंतरंग लैंगिक संबंधांचे चित्रीकरण करून तिला सोन्याचे दागिने आणि पैशांची खंडणी मागत ब्लॅकमेल करू लागला. हे कृत्य एखाद्या सराईत गुन्हेगाराने केलेले नसून सद् रक्षणाय,खल निग्रहणाय असे ब्रिदवाक्य असलेल्या पोलिस विभागात कार्यरत पोलिस शिपायाने केले आहे. एकीकडे महिलांवरील अत्याचार वाढत असताना रक्षकच भक्षक झाल्यावर कुणाकडे दाद मागायची, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. खाकी वर्दीला कलंकित करणाऱ्या या नराधम पोलिस शिपायाचे नाव पद्माकर भगवान भोजने (वय ३८) असे आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्यावर लैगिक शोषण, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायदा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
  • समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे हे पोलिस विभागाचे कर्तव्य आहे. पण याच विभागात काम करताना आपले कर्तव्यच नव्हे तर माणूसकीही विसरलेल्या पोलिस शिपाई पद्माकर भोजने याने एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्याने विवाहित असतानादेखील पत्नीला घटस्फोट दिल्याचा बहाणा करून एका २७ वर्षीय पीडित तरुणीवर प्रेमाचे जाळे फेकले. तिला लग्नाचे खोटे आश्वासन देत आपल्या जाळ्यात ओढले होते. तरुणीही त्याच्या भूलथापांवर भाळली. त्याने लग्नाचे स्वप्न दाखवत तिच्या शरीराशी खेळणे सुरू केले. वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले. इतकेच नाही तर, लैगिक शोषणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. त्या पीडित तरुणीला शारीरिक संबंधाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. एवढेच नव्हे तर त्याने पीडितेकडे दीड लाखाचे दागिने आणि रोख सव्वातीन लाख रुपयाच्या खंडणीचीही मागणी केली होती, पोलिस शिपाई भोजनेच्या या सततच्या अत्याचाराला व तगाद्याला त्रासून पीडित तरुणीने २३ जून रोजी आरोपी पोलिस शिपाई पद्माकर भोजने याच्याविरुद्ध गडचिरोली पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी भोजनेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलिसांकडून करण्यात येत आहे. जनतेच्या रक्षणासाठी असलेल्या पोलिस विभागातील शिपायाच्या या भयंकर कृत्याने समाजमन सुन्न झाले आहे.
  • —————————-