वनविभागाच्या वनमहोत्सव केंद्रातून सवलतीत मिळणार रोपे

90
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. २ : स्थानिक गडचिरोली वनवृत्त कार्यालय आणि नगरपालिका येथे वनविभागाचे वन महोत्सव केंद्र जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या केंद्रातून नागरिकांना सवलतीच्या दरात अर्ध्या किमतीत रोपे मिळणार आहेत.
  • कृषीदिन तसेच वृक्षलागवड सप्ताहाचे औचित्य साधून मुख्य वन संरक्षक कार्यालय आणि नगर परिषद येथे गडचिरोली प्रादेशिक वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव कालावधीत रोपे विक्रीसाठी वन महोत्सव केंद्र सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार, उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी गणेश झोळे तसेच गडचिरोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या वतीने सन २०२४-२५ मध्ये एक पेड माॅं के नाम ही योजना तसेच राज्य सरकारच्या वतीने अमृत वृक्ष आपल्या दारी योजना १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी केले.
  • देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार एक पेड माॅं के नाम योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांनी केले. वृक्षतोडीमुळे होत असलेल्या हवामान बदलांमुळे वाढत असलेली उष्णता आणि अनियमित पाऊस यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडे लावणे आणि वनांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन विभागीय वनाधिकारी गणेश झोळे यांनी केले. एक पेड माॅं के नाम आणि अमृत वृक्ष आपल्या दारी योजनेअंतर्गत स्थानिक १५ महिलांना सीताफळ वृक्षांचे वाटप करण्यात आले. वन महोत्सव कालावधीत ९ महिन्यांची तसेच १८ महिन्यांची रोपे सवलतीच्या दरात निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत. लागवड केलेल्या रोपांची माहिती अमृतवृक्ष या मोबाईल ॲपवर नागरिकांना भरता येणार आहे.