अशोक भापकर यांचे मुलचेरा पोलिस ठाणे सर्वोत्कृष्ट

137

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता.१६ : पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या संकल्पनेतून ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर ऑफ द इयर’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. यात कोल्हापूरचे सुपुत्र अशोक भापकर यांच्या उत्तम कामगिरीमुळे मुलचेरा पोलिस ठाणे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. नक्षलग्रस्त व प्रतिकूल परिस्थितीत खडतर सेवा बजावतानाच त्यांनी गडचिरोली पोलिस दलमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ देऊन विविध सामाजिक उपक्रम राबविल्याने त्यांचा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अशोक भापकर यांच्या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पोलिस ठाणे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भापकर यांना ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर ऑफ द इयर’ हा पुरस्कार दिला.

चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून १५ ऑगस्ट १९९२ ला मुलचेरा तालुक्याची निर्मिती करण्यात आली होती. त्याच दरम्यान तालुक्यात विविध कार्यालये स्थापन करण्यात आली. त्यात मुलचेरा पोलिस स्टेशनची स्थापना झाली. मुलचेरा पोलिस स्टेशनअंतर्गत एकूण ४२ गावांचा समावेश असून बरीच गावे अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावे आहेत. एवढेच नव्हेतर या ठिकाणी पुनर्वसित बंगाली बांधवांची संख्यादेखील अधिक आहे.अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून पोलिसांप्रति विश्वास निर्माण करण्याचे काम तसेच गडचिरोली पोलिस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठाणेदार अशोक भापकर यांनी मोलाची कामगिरी बजावली. ठाणेदार अशोक भापकर यांनी यापूर्वी कोटमी पोलिस मदत केंद्रात २ वर्ष सेवा दिली होती. परत त्यांना ५ मार्च २०२२ ते आजतागायत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सेवा देण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी पोलिस ठाण्यासाठी जागेचा प्रश्न सोडवून सुसज्ज कार्यालय बनवून संपूर्ण पोलिस स्टेशनचे रूप पालटले. ऑगस्ट २०२२ ते मे २०२३ पर्यंत त्यांनी येथील विविध बांधकामे पूर्ण केली. सोबतच गावात सुसज्ज वाचनालय, ओपन जिम, पोलिस स्टेशन परिसरातील हनुमान मंदिर सुशोभीकरण, पोलीस दादालोरा खिडकी रूम बांधकाम,परिसरात स्ट्रॉबेरी आणि ऊस लागवड, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण, रोजगार, आरोग्य आणि कृषी मेळावे घेऊन नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ दिले. तसेच व्यसनमुक्ती शिबिर घेऊन परिसरात अवैध दारू विक्री होणार नाही आणि अवैध दारूची वाहतूक होणार नाही आणि झाल्यास दारू वाहतूक करणारे आणि विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यासोबतच शहरात श्रमदान करून मुख्य चौकात असलेल्या बसस्थानकाचेदेखील रूप पालटले. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना बसण्याची सोय झाली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलिस मुख्यालयात घेण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर ऑफ द इयर’ या पुरस्काराने त्यांचा सन्मान करून प्रशस्तिपत्र व १० हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली. आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात दोनदा सेवा करण्याची संधी मिळाली. त्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आणि त्याचा लाभ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. मुलचेरा पोलिस स्टेशनचे रखडलेले काम देखील या कार्यकार्यात वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले. व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कासोबत सामाजिक कामातही योगदान देण्याच्या हेतूने राष्ट्रगीताने दिवस सुरू करण्याचा उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्याला एकमताने सर्वांनी होकार दिल्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला. हा उपक्रम आजही अविरतपणे सुरू असल्याचा अभिमान आहे. अशोक भापकर यांनी ठाणेदार म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर मुलचेरात एक अभिनव उपक्रम राबविला तो आजही निरंतर सुरू आहे. मुलचेरा शहरात १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी सकाळी ८.३० वाजता दररोज राष्ट्रगीत घेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. त्याला नागरिकांनीदेखील प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आजही मुलचेरा तालुका मुख्यालयात राष्ट्रगीताने कामाचा श्रीगणेशा होतो. तेलंगणा राज्यातील नेलगोंडा या गावात असाच उपक्रम राबविला जातो. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील भिलवडी येथे या उपक्रमाला सुरुवात झाली होती. असाच राष्ट्रीय उपक्रम मुलचेरा तालुका मुख्यालयात त्यांनी राबविला. त्यामुळे मुलचेरा हे भारतातील तिसरे तर महाराष्ट्रातील दुसरे गाव आणि गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रगीत उपक्रम राबविणारे पहिले गाव ठरले आहे.

———————————