टेलर टिमच्या वरीष्ठ जहाल महिला माओवाद्याने केले आत्मसमर्पण

202

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २७ : माओवाद्यांच्या टेलर टिमच्या एका वरीष्ठ जहाल महिला माओवाद्याने गडचिरोली पोलिस व केंद्रीय राखीव पोलिस दलापुढे शनिवार (ता. २७) आत्मसमर्पण केले. रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता ( वय ३६) रा. बोटनफुंडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली, असे या महिला माओवाद्याचे नाव आहे. , ती गडचिरोली दलमच्या टेलर टिम (माओवाद्यांचे कपडे तयार करणारी टिम) कमांडर म्हणून कार्यरत होती. शासनाने तिच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. विशेष म्हणजे माओवाद्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्याकडे होती.

शासनाने सन २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६७१ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. शनिवारी रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिने आत्मसमर्पण केले. रिना नरोटे २००६ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली होती. २००७ पासून सप्लाय टिम सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००७-०८ मध्ये शिवणकला, कापड कटींग व शिलाई मशिन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. २००८–१४ मध्ये टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. २०१४ मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यत कार्यरत होती. या कार्यकाळात २०२० मध्ये पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच २०१९ मध्ये नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध व्यक्तीच्या खुनातसुद्धा तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते २०२४ दरम्यान आतापर्यंत एकूण २३ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूरचे संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलिस उप-महानिरीक्षक (अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, बटालियन ९ चे कमांडंट शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनात पार पाडली. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिला एकूण ५.५ लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल. तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्विकारावा, असेही ते म्हणाले.