जहाल महिला माओवाद्याने केले आत्मसमर्पण आणि जनमिलिशियाही पोलिसांच्या पंज्यात

104

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २१ : गडचिरोली पोलिस दलापुढे शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केलेल्या महिला माओवाद्याने २१ आॅगस्ट रोजी आत्मसमर्पण केले. याशिवाय २० आॅगस्ट रोजी पोलिसांनी कापेवंचा खून प्रकरणातील जनमिलिशियाला अटक केली.

जहाल महिला माओवादी संगीता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता ( वय ४०) रा. तुर्रेमरका, पो. लाहेरी, ता. भामरागड, जि. गडचिरोली हिने गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. ती २००७ मध्ये नैबरेड दलम माड डिव्हिजन नारायणपुर (छ.ग) मध्ये सदस्य पदावर भरती झाली. २००८ मध्ये कोहकामेटा दलम माड डिव्हिजन नारायणपुर (छ.ग) मध्ये बदली होऊन २०१० पर्यंत कार्यरत होता. २०१० मध्ये महासमुंद (छ.ग.) दलममध्ये बदली व त्यानंतर २०१४ मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर ७ चकमकींमध्ये सहभाग, १ जाळपोळ, ३ खून प्रकरणांत प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच कापेवंचा येथील निरपराध व्यक्तीच्या खुनात पाहिजे असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांनी केली अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण २ लाख रुपयांचे बक्षीस केले होते. प्रमोद मधुकर कोडापे ( वय ३७) रा. भंगारामपेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली असे त्याचे नाव आहे. मंगळवार (ता. २०) जिमलगट्टा उपविभागाअंतर्गत दामरंचा उप पोलिस स्टेशन हद्दीतील भंगारामपेठा जंगल परीसरामध्ये दामरंचा पोलिस पथक व सीआरपीएफ जी-९ बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असतांना त्यांना जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळुन आल्याने पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता त्याचे नाव प्रमोद कोडापे असून तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मागील वर्षी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी कापेवंचा येथील रामजी आत्राम रा. कापेवंचा ता. अहेरी जि. गडचिरोली याचा माओवाद्यांकडून खुन करण्यात आला होता. त्यावरून राजाराम (खां.) उप पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला प्रभारी अधिकारी यांच्या ताब्यात देऊन अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवून पोलिसांविरुद्ध कट रचणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.

ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफचे कमांण्डट दाओ इंजिरकान कींडो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

—————————