जिल्ह्यातील विविध समस्यांवर काँग्रेसचे धरणे, चक्काजाम

35

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३० : गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांना असह्य त्रास होत असून अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासह इतर प्रमुख मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात व खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार (ता.३०) धरणे व चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी, शंकरराव सालोटकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष जीवन नाट, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अॅड. विश्वजीत कोवासे, अतुल मल्लेलवार, वामनराव सावसाकडे, रामदास मसराम, केसरी उसेंडी, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,वसंत राऊत, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, रजनीकांत मोटघरे, हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, छगन शेडमाके,संजय चन्ने, रूपेश टिकले, घनश्याम वाढई, तेजस मडावी, कुसूम आलाम, डॉ. सोनल कोवे, पुष्पलता कुमरे, उषा धुर्वे, मंगला कोवे, अपर्णा खेवले, भारत येरमे, अब्दुल पंजवाणी, सुभाष धाईत, उत्तम ठाकरेसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील गडचिरोली-आरमोरी, आष्टी-अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग आणि चामोर्शी-मूल राज्यमार्ग सह जिल्ह्यातील इतरही रस्त्याच्या दुरूस्ती संदर्भात वारंवार मागणी करून देखील अद्याप रस्त्याची दुरूस्ती झाली नाही, तत्काळ दुरुस्ती करावी, सुरजगाड येथून चालणाऱ्या जड वाहतुकीने रस्त्याची चाळण झाली असून अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस  वाढत चालले आहे त्यावर प्रभावी उपाय योजना करावी,गडचिरोली अतिदुर्गम व मागास जिल्हा असूनसुद्धा रस्ते विकासाकरिता राज्य सरकारने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत फक्त १० टक्के निधी दिला आहे, त्यामुळे अनेक कंत्राटदारांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला असून अनेक नागरिकांना त्रास होणार आहे. म्हणून रस्ते विकासासाठी अतिरिक्त निधी वाढवून द्यावा, जिल्ह्यातील अनेक घरकुलधारकांना घरकुलचे पैसे मिळाले नाही. घरकूलधारकांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा करावेत, वारंवार मागणी आणि आंदोलन करूनसुद्धा रानटी हत्तीचा अद्याप बंदोबस्त करण्यात शासन अपयशी ठरत आहे त्यावर प्रभावी उपाय योजना करण्यात याव्यात, रेल्वेचे काम चालू झाल्याने त्याच्या मातीकामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नसून तत्काळ नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी, कोनसरी परीसरातील शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला देण्यात यावा, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्ण खिळखिळी झाली असून त्यात सुधारणा करावी, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला किमान १२ तास नियमित वीजपुरवठा करावा, जिल्ह्यात सुरु असलेले भार नियमन बंद करावे, जिल्ह्यात अतिरिक्त बसेस उपलब्ध करून द्याव्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————