ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. २३ : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला आहे. गडचिरोली जिल्ह्रात देखील सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्रातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली आहे. या पार्श्वभूमीर पोलिसांनी देसाईगंज तालुक्यात तब्बल ५ लाख ४४ हजार ३०४ रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.
मंगळवार (ता. २२) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गस्तीदरम्यान अर्जूनी – देसाईगंज मार्गे चारचाकी वाहनाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू देसाईगंज हद्दीतील चिल्लर तंबाखू विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जुनी ते देसाईगंजकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला असता संशयीत चंदेरी रंगाची टोयोटा कंपनीची इनोव्हा चारचाकी वाहन येत असताना दिसले. वाहनाला तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहन थांबविण्यात आले. त्यानंतर वाहन चालकाचे नाव व पत्ता विचारला असता अस्पाक मुन्ना शेख ( वय २५) रा. संजयनगर पिंडकेपार, जि. गोंदिया असे सांगितले. यानंतर पोलिसांनी वाहन चालक व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता वाहनात ५ लाख ४४ हजार ३०४ रुपये किंमतीचा अवैध सुगंधित तंबाखू आढळला. वाहन चालकास सुगंधित तंबाखूबाबत विचारपूस केली असता, त्याने हा सुगंधित तंबाखू गोंदिया येथील रवी मोहनलाल खटवानी याचा असल्याचे सांगितले. यावरून वाहनातील सुगंधित तंबाखू व सुगंधित तंबाखू वाहून नेण्याकरिता वापरात आणलेली ३ लाख ८० हजार रुपये किंमतीची इनोव्हा चारचाकी वाहन क्र. एम.एच.-१५-बी.एन.-५६८९असा एकूण ९ लाख २४ हजार ३०४ रुपये किंमतीचा मुद्देमाल गडचिरोली पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे आरोपी अस्पाक मुन्ना शेख (वय २५) रा. संजयनगर पिंडकेपार, जि. गोंदिया रवी मोहनलाल खटवानी, रा. गोंदिया जि. गोंदिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सरीता मरकाम, पोलिस हवालदार दीपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, पोलिस अंमलदार सचिन घुबडे, निशीकांत अलोणे, निकेश कोडापे यांनी पार पाडली.
———-










