ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ११ : जिल्ह्रात विविध ठिकाणी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत. अलिकडच्या काळात सिरोंचा हद्दीमध्ये अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या, त्याबाबत विविध गुन्हे सिरोंचा पोलिस स्टेशन येथे दाखल आहेत. पोलिसांनी तब्बल ११ गुन्हे उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली आहे.
प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांच्या पोलिस स्टाफने विविध चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेतला असता पोलिस उपनिरीक्षक प्राजंली कुलकर्णी या अंमलदारासह पोलिस स्टेशन हद्दीत रात्रगस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित आकाश नागया कोत्तापेल्ली ( वय २०) रा. कोत्तापल्ली, ता. सिरोंचा जि. गडचिरोली आढळला. त्याला त्वरित ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेल्या मुद्देमालावरून त्याने समाधानकारक उत्तरे न देता उडवा-उडवीची उत्तरे पोलिसांना दिली. त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणून अधिक सखोली चौकशी केली असता, त्याने सिरोंचा पोलिस स्टेशन हद्दीतील व असरअल्ली परिसरातील एकूण ११ ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले. चौकशीदरम्यान सांगिलेल्या ठिकाणी त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी छापे टाकले असता चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सिव्हील कामाचे साहित्य, घरगुती वस्तू, कपडे, मोबाईल फोन्स आदी मोठ्या प्रमाणावर २ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी आकाश कोत्तापेल्ली सराईत गुन्हेगार असल्याचे तपासावरून निदर्शनास आल्याने तसेच सिरोंचा पोलिस स्टेशन येथे दाखल विविध सात चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठीडीत अधिक चौकशीनंतर त्याने केलेले इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मारोती नंदे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक सत्य साई कार्तिक तसेच सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मारोती नंदे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे, पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र वांगाटे, पोलिस उपनिरीक्षक प्रांजली कुलकर्णी, लावण्या जक्कन, पोलिस हवालदार मनीष गर्गे, पोलिस अंमलदार सुनिल घुगे, राकेश नागुला, मानतेश दागम, सुनील राठोड व संतोष भताने यांनी पार पाडली.
—————————–










