Home Gadchiroli जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

227

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : जिल्ह्यात वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने घोट व चामोर्शी परीसरात जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

प्राप्त माहितीनुसार १९ जून २०२५ रोजी फिर्यादी महिला प्रिया विकास मंडल ही आपल्या दुचाकी वाहनाने चामोर्शी ते घोट असा प्रवास करत असताना घोटपासून दोन किमी अंतरावर असलेल्या हनुमान मंदिराजवळ दोन अनोळखी मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या पाठीवर लटकवलेली १ लाख २५ हजारे ३९ रुपयांनी भरलेली काळ्या रंगाची बॅग हिसकावून जंगलाच्या दिशेने पळून गेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून घोट पोलिस मदत केंद्रात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच फिर्यादी महिला ही आपल्या दुचाकी वाहनाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी गणपूर ते अड्याळकडून चामोर्शीकडे जात असताना गणपूरपासून अंदाजे दोन किमी अंतरावर दोन अज्ञात हेल्मेटधारण करून असलेल्या मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या पाठीवर असलेली १ लाख ३४ हजार ६४ रुपयांची बॅग हिसकावून पळ काढला. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून चामोर्शी पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व चामोर्शी पोलिस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदारांची दोन पथके तयार करण्यात आली होती. ही दोन्ही पोलिस पथके समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने या गुन्ह्यातील आरोपींचा अत्यंत शिताफीने शोध घेऊन शशांक संजय दुर्गे (वय २७) व राजा तोताराम कोरडे ( वय २५) दोघेही रा. मलेझरी, ता. मुलचेरा व जि. गडचिरोली यांना ताब्यात घेऊन दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबूली दिली. या दोन्ही आरोपींना शुक्रवार (ता.५) अटक करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अटक आरोपींचा यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारच्या आणखी कोणकोणत्या गुन्ह्यात सहभाग होता, याबाबत पोलिस दलाकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुमित बनसोडे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलिस हवालदार सतीश कत्तीवार, नायक पोलिस अंमलदार धनंजय चौधरी, पोलिस अंमलदार राजू पंचफुलीवार, शिवप्रसाद करमे, चालक पोलिस अंमलदार दीपक लोणारे यांनी पार पाडली.

——————————