ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १२ : राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याच्या विविध प्रलंबित व जनजीवनाशी संबंधित मुद्द्यांबाबत तातडीने निर्णय व्हावेत, यासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शुक्रवार (ता. १२) नागपूर येथे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांची विशेष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली तसेच लिखित निवेदन सादर करत जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ठोस मागणी केली.
माजी आमदार डॉ. होळी यांनी जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे व तातडीचे प्रश्न विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देत तातडीने कार्यवाहीची मागणी केली. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती, मजबुतीकरण व नवीन रस्त्यांची उभारणी करण्याची मागणी डॉ. होळी यांनी केली. शेतकऱ्यांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत असल्याने जिल्ह्यात नवीन बंधारे, नालाबांधणी आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्यातील जात पडताळणी समिती अन्यत्र हलविण्याची प्रक्रिया थांबवावी, कारण यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे निर्माण झालेली शिक्षणातील पोकळी भरून काढणे जिल्ह्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही पदे तातडीने भरावी, अशी डॉ. होळी यांची ठाम मागणी होती. जिल्ह्यातील आश्रमशाळांची स्थिती अत्यंत खराब आहे. त्यांची दुरुस्ती, सुविधांचे उन्नतीकरण आणि रिक्त शिक्षक पदे भरणे यावरही त्यांनी विशेष भर दिला. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या १० वर्षांतील आमदारकीच्या कार्यकाळातील जुन्या आठवणीचा उजाळा देत प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या या भेटीमुळे जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, शिक्षण, आश्रमशाळा व प्रशासनिक सुविधा मजबूत करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
—————————————










