गडचिरोली:
सिरोंचा: ऑटोत प्रवासी भरण्याच्या क्रमांकावरून दोन चालकांत वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. याप्रकरणी तीन ऑटो चालकांना दोषी ठरवून येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १६ मार्च रोजी सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.
अंक बत्ता, महेश बोंद्यालू धर्मराजूला व सागर नागया बालसपेल्ली अशी त्या तीन चालकांची नावे आहेत. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी राजेश्वरराव कंबागोनी (रा. नगरम) यांनी या तिघांविरुद्ध सिरोंचा ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यानुसार, ऑटोमध्ये प्रवासी भरण्याच्या क्रमांकावरून तिघांनी मिळून डोक्यात लोखंडी पाण्याने मारून दुखापत केली व खिशातील ८ हजार ४०० रुपये काढून घेतले, असे नमूद होते. तत्कालीन उपनिरीक्षक शीतल धविले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. प्रथमवर्ग न्या. श्रीकांत पचंडी यांनी साक्षीपुरावे तपासून तसेच सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना सहा महिन्यांचा कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील सचिन देरकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून अंमलदार मलाया सुंकरी यांनी त्यांना साहाय्य केले.









