ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ७ : जिल्ह्याच्या भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या अबुझमाड जंगल परिसरात माओवादविरोधी मोहीम राबवत असताना पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत पोलिसांनी गडचिरोली विभागीय कमिटी प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी तसेच सीपीआय माओवादी संघटनेच्या कंपनी क्रमांक १० चा प्रभारी प्रभाकर, रा. कामारेड्डी, तेलंगणा याच्यासह आणखी ६ जहाल माओवाद्यांना ठार केले आहे. त्यामुळे या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या ७ झाली आहे. विशेष म्हणजे माओवादी प्रभाकर याच्यावर एकूण २५ लाखांचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार गुरुवार (ता. ५) रात्री उशिरापर्यंत तीन माओवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले होते. त्याव्यतिरिक्त आज (ता ६) दिवसभरात सुरू असलेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरून आणखी ४ माओवाद्यांचे मृतदेह (२ पुरुष व २ महिला) हस्तगत करण्यात आले आहेत. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अभियानाच्या अखेरीस एकूण ७ माओवाद्यांचे मृतदेह (४ पुरुष व३ महिला) हस्तगत करण्यात आले आहेत. त्यासोबतच घटनास्थळावरून ३ ए.के. ४७, १ एसएलआर व एक .३०३ रायफल अशी एकूण ५ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. यादरम्यान, सी-६० पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी (वय ३८ वर्षे), रा. अहेरी व मूळ रा. मांड्रा , दामरंचा, ता. अहेरी यांनी गुरुवारी सायंकाळी माओवाद्यांशी झालेल्या तीव्र चकमकीत शौर्याने लढा देत २ माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना एक गोळी लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यांना हेलिकॉप्टरद्वारे उपजिल्हा रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे. शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याशिवाय या अभियानादरम्यान आणखी एक जवान जोगा मडावी, रा. किष्ट्यापल्ली यांनाही गुरुवारी रात्री गोळी लागून दुखापत झाली होती. त्यांना देखील हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढून गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत व त्यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मृत माओवाद्यांची ओळख तसेच अभियानासंदर्भातील इतर तपशील गडचिरोली पोलिसांकडून शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.
————————————–










