बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर व नगरसेवक सागर निबोंरकर यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २३ : गडचिरोली शहरातील इंदिरानगर प्रभाग क्र. ३ येथे लोकवर्गणीतून उभारण्यात येत असलेल्या हनुमान मंदिराच्या वॉल कंपाऊंड बांधकामाचे भूमिपूजन अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. परिसरातील नागरिकांच्या सक्रिय सहभागातून साकार होत असलेल्या या उपक्रमामुळे मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण आणि सुरक्षितता अधिक मजबूत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर (न.प.) तथा अध्यक्ष, हनुमान सेवा समिती, इंदिरानगर आणि नगरसेवक सागर निबोंरकर यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून भूमिपूजन करण्यात आले. मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मनोगत व्यक्त करताना अनिल कुनघाडकर यांनी मंदिर विकासासाठी नागरिकांनी दिलेल्या लोकवर्गणीचे कौतुक केले. समाजाच्या एकोप्याचे हे उत्तम उदाहरण असून धार्मिक स्थळांच्या विकासातून सामाजिक एकात्मता अधिक दृढ होते, असे त्यांनी नमूद केले. नगरसेवक सागर निबोंरकर यांनीही मंदिर परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमास राजू बोबाटे, देवानंद खोब्रागडे, गजू विरवार, शंकर चिलबुले, संजय पिपरे, सुजित मेश्राम, राहुल गिरसावळे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उभारण्यात येणारे वॉल कंपाऊंड पूर्ण झाल्यानंतर भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीत वातावरण उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या या बांधकामामुळे इंदिरानगर परिसरातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांना नवी चालना मिळणार आहे.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, एकोपा आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला.










