फुले वार्डमधील स्वस्त धान्य दुकानासाठी नागरिकांचा आक्रोश; नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर यांचा ठाम पुढाकार

84

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. २५ : शहरातील प्रभाग क्र. १ मधील फुले वार्ड येथे मागील दोन वर्षांपासून स्वस्त धान्य दुकान (राशन दुकान) बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व आक्रोश निर्माण झाला आहे. संबंधित दुकान दुसऱ्या प्रभागात सुमारे तीन किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात आल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच गरजू कुटुंबांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली न लागल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “अन्नधान्यासारख्या मूलभूत हक्कासाठी एवढी पायपीट का करावी लागते?” असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

ही गंभीर बाब प्रभागातील नागरिकांनी नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर व नगरसेवक सागर निबोंरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या समस्या ऐकताच नगराध्यक्षांनी तात्काळ दखल घेत ठाम भूमिका मांडली. “फुले वार्डमधील नागरिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही. स्वस्त धान्य दुकान पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. गरज भासल्यास उच्चस्तरावर पाठपुरावा करू,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

यानंतर नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर, नगरसेवक सागर निबोंरकर व प्रभागातील नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. नागरिकांना होत असलेल्या गैरसोयींबाबत तीव्र भावना व्यक्त करत फुले वार्डमध्ये स्थायी स्वरूपात स्वस्त धान्य दुकान तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय बारापात्रे, पवन बावणे, अतुल निपाणे, प्रफुल तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नगराध्यक्षांच्या ठोस भूमिकेमुळे प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली सुरू होतील व लवकरच फुले वार्डमध्ये स्वस्त धान्य दुकान पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. “नागरिकांच्या हितासाठी नगरपरिषद सदैव तत्पर राहील,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.