सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकावर फसवणुकीचा आरोप; महिलांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरू, महेंद्र ब्राह्मणवाडे यांची आंदोलनस्थळी भेट

160

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. २७ : चामोर्शी येथे अगरबत्ती प्रकल्प सुरू करून रोजगार देण्याचे आमिष दाखवत भारतीय जनता पक्ष (भाजप)च्या एका नगरसेवकाने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करत काही महिला गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपोषणास बसल्या आहेत. या उपोषणकर्त्या महिलांची भेट गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

सदर प्रकरणात सत्ताधारी पक्षातील नगरसेवकाचा थेट नामोल्लेख असल्याने प्रशासनावर दबाव आणून उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे काही महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही त्यांच्या पक्षातील नगरसेवकाविरोधात गंभीर आरोप होत असताना महिलांवर उपोषणाची वेळ येणे दुर्दैवी असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, विपुल येलटीवार, नंदू कुमरे, पवन गेडाम यांच्यासह आंदोलनकर्त्या महिला आणि पदाधिकारी उपस्थित होते.