आधी प्रेमाचा प्रस्ताव, मग लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, शेवटी युवकाला अटक

154

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : त्याने आधी अल्पवयीन मुलीपुढे प्रेमदिनाच्या दिवशी आपला प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. तिला पद्धतशीर जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार करत राहिला. अखेर तीन महिन्यांची गर्भवती झालेली ती अल्पवयीन मुलगी पोलिस ठाण्यात गेली आणि तिची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मागील वर्षी २०२५ मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी अल्पवयीन मुलीला प्रपोज केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकास कोरची पोलिसांनी अटक केली आहे. अजय टिल्लू कल्लो (वय २५, रा. जांभळी, ता. कोरची) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अजय कल्लो हा ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी १४ फेब्रुवारी २०२५ ला १७ वर्षीय पीडित मुलीला भेटला. ‘तू मला खूप आवडतेस’, असे म्हणून अजयने तिला प्रपोज केले. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून तिला विश्वासात घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अनेकदा तो लग्नाचे आमिष दाखवून १० मार्च २०२६ पर्यंत तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत राहिला. यामुळे ती ३ महिन्यांची गर्भवती झाली. त्यानंतर तिने कोरची पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दिलेल्या वैद्यकीय अहवालात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी ११ मार्चला आरोपी अजय कल्लो यास भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) (एम), ६४ (२) (आय), सहकलम पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत.

————————