चार जहाल माओवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश

359

गडचिरोली, ता. १९ :

जिल्ह्यातील कोलामर्का पहाडी परीसरात चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या चारही माओवाद्यांवर महाराष्ट्र सरकारने एकूण ३६ लाख रुपयांचे बक्षिस ठेवले होते.

शनिवार (ता. १६)पासून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी पार करून गडचिरोत आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाचे जवान व सीआरपीएफच्या क्यूएटी पथकातील जवान जिमलगट्टा उपविभागाअंतर्गत रेपनपल्ली उप पोलिस स्टेशनपासून दक्षिण-पूर्व ५ कि.मी अंतरावर असलेल्या कोलामर्का पहाडी जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवित असताना मंगळवार (ता. १९) पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिस जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याचे आवाहन केले. मात्र माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. या चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर ४ पुरुष माओवादी मृत अवस्थेत आढळले. डीव्हीसीएम, मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती सचिव तथा कुमरामभिम मंचेरीयल विभागीय समिती सदस्य व्हर्गिस (वय २८) रा. जि. बिजापूर (छत्तीसगड) , डीव्हीसीएम, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती सचिव पोडीयम पांडू उर्फ मंगुलू (वय ३२) रा. कोटराम, भैरमगड जि. बिजापूर (छत्तीसगड) , प्लाटून सदस्य कुरसंग राजू, प्लाटुन सदस्य कुडीमेट्टा व्यंकटेश यांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण ३६ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. यासोबतच घटनास्थळावरुन १ नग एके ४७ रायफल, १ नग कार्बाइन रायफल, २ नग देशी बनावटी पिस्तुल, जिवंत काडतुस व इतर स्फोटक साहित्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलिस दलास यश आले आहे. हे अभियान विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूरचे संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) जगदीश मीणा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख , अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश व पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात पार पडले. सी-६० कमांडोंच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे सर्व वरीष्ठांनी कौतुक केले आहे.