तेलंगणातून परतलेल्या हत्तीचा चिरेपल्लीत धुमाकूळ

126

गडचिरोली, ता. २४ : तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणारा रानटी हत्ती तेलंगणातून परतल्यानंतर रेपनपल्ली (प्राणहिता) वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात १८ दिवस मुक्काम ठोकून मंगळवार २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास आलापल्ली – सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून चिरेपल्ली जंगल परिसरात आला. येथे त्याने प्रचंड धुमाकूळ घातला असून परीसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे.

३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मूलचेरा तालुक्यातील नागुलवाही गावाजवळून वाहणारी प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगणा राज्यात प्रवेश केला होता. कुमरमभीम जिल्ह्यातील चिंतलमानेपल्ली तालुक्यात बुरेपल्ली येथे मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या अल्लुरी शंकर या शेतकऱ्यावर हल्ला करत ठार केले. त्यानंतर ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास धानाच्या शेतीत काम करणाऱ्या कारू पोशण्णा नामक शेतकऱ्याला पायाखाली तुडवून ठार केले. २४ तासात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी होताच येथील महसूल व वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध पथके तयार करून त्या हत्तीवर पाळत ठेवली होती. ६ एप्रिल रोजी त्या रानटी हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला. ६ एप्रिलपासून त्या रानटी हत्तीने रेपनपल्ली वनपरीक्षेत्रातील विविध जंगल परिसरात मुक्काम ठोकला होता. लंकाचेन आणि लख्खामेट्टा जंगलाच्या मधोमध असलेल्या बल्लाळम परीसरात बरेच दिवस त्याचे वास्तव्य होते. रेपनपल्ली, गोलाकर्जी, गुड्डीगुडम, नंदीगाव या परिसरात हत्ती लवकरच एन्ट्री करणार असा अंदाज होता. मात्र, डोंगराळ भाग असल्याने हा रानटी हत्ती या परीसरात लवकर येऊ शकला नाही. शिवाय या भागात त्याला पोषक वातावरण मिळाल्याने जवळपास तो १८ दिवस याच परिसरात मुक्काम ठोकून होता. या दरम्यान सिरोंचा वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या हत्तीवर पाळत ठेवली होती. अखेर मंगळवारी गुड्डीगुडम येथील शासकीय आश्रमशाळेच्या परीसरातून आलापली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून त्या हत्तीने चिरेपल्ली जंगल परीसरात प्रवेश केला. एवढेच नव्हे तर या परीसरात येताच त्याने कोत्तागुडम येथील पान टपरीवर हल्ला करत तोडफोड केली. त्यामुळे या भागातील राजाराम, कोडसेपल्ली, कोत्तागुडम, पत्तीगाव, चिरेपल्ली, खांदला, झिमेला आदी गावांना आता त्या हत्तीपासून धोका निर्माण झाला आहे. सध्या कमलापूर वनपरीक्षेत्रातील या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कमलापूर आणि रेपनपल्ली या दोन वनपरीक्षेत्रातील दोन चमू हत्तीचा मागोवा घेत आहेत. विशेष म्हणजे कमलापुर येथील हत्तीकॅम्प परिसरात ९ हत्ती वास्तव्याने आहेत. हा रानटी हत्ती या हत्तीकॅम्पकडे जाणार की इंद्रावती नदी ओलांडून छत्तीसगड राज्यात जाणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. मंगळवार रात्रीपासून हत्ती कॅम्पमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीदेखील गस्त घातली होती.