ग्रामस्थांच्या मदतीने दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल

152

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ५ :

चामोर्शी तालुक्यातील व पोटेगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या गिलगाव येथे पोलिस, गावातील महिला व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या कारवाई करत विक्रेत्यांकडून ३० लिटर मोहफुलाची दारू जप्त करून दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गिलगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच रेखा आलाम यांच्या अध्यक्षतेत गावातील महिलांची बैठक पार पडली. यावेळी गावातील दारूविक्री बंद करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गावात दारूविक्री सुरु असल्याने अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, अनेक युवक दारूच्या आहारी जात असून त्यांचे शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. यासाठी गावातील दारूविक्री बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. यासंदर्भातील निवेदन पोलिस मदत केंद्र पोटेगाव येथे देण्यात आले. त्यानंतर मुक्तिपथ टीमने गावातील महिलांची बैठक घेऊन दारू विक्रेत्यांना नोटीस दिली. तसेच दोन दारूविक्रेत्यांविरोधात कारवाई करत ३० लिटर दारू पकडण्यात आली व पोटेगाव पोलिस मदत केंद्र येथील कर्मचाऱ्यांना बोलावून २ दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी मुक्तिपथचे विनोद पांडे, आनंद सिडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग मोगारकर व गावांतील महिला उपस्थित होत्या. विशेष म्हणजे गावातून अवैध दारूविक्री बंदीसाठी महिलांकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत. गावातील महिला दारू विक्रेत्यांवर वॉच ठेवून असून मुजोर दारूविक्रेत्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

—————