तो गाढ झोपेत असताना चक्क पेट्रोल टाकून पेटवले

132

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २ : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या छल्लेवाडा या गावात एक भयंकर घटना घडली असून मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या एका ग्रामस्थाच्या अंगावर काही अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. चरणदास गजानन चांदेकर (वय ४८) असा अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना १जून  २०२४ रोजी मध्य रात्रीघडली. पेट्रोलमुळे गंभीररूपात जळालेल्या चांदेकर यांना तत्काळ चंद्रपूरला रेफर करण्यात आले असून येथे उपचार सुरू आहेत.

सध्या तीव्र उन्हाळा व नवतपा सुरू आहे. ग्रामीण भागांत कुलर तर दूर पंख्याचीसुद्धा व्यवस्था नसते. टेबल फॅन किंवा सिलिंग फॅन असला, तरी ही उपकरणे चालविण्यासाठी गावात वीज नसते किंवा वीज असली, तरी तिचा वारंवार लपंडाव सुरू असतो. त्यामुळे ग्रामीण भागांतील बहुतांश नागरिक रात्री घरापुढील अंगणात झोपतात. अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त छल्लेवाडा येथील चरणदास चांदेकरसुद्धा असेच घरासमोरील अंगणात खाटेवर झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री ते गाढ झोपेत असताना काही अज्ञात व्यक्ती तेथे आले. गाढ झोपेत असलेल्या चांदेकर यांना काही कळण्यापूर्वीच त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली व पळून गेले. यावेळी त्यांच्या बाजूला दुसऱ्या खाटेवर झोपून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी आग विझवली. परंतु तोपर्यंत आगीमुळे चरणदास यांना गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे. छल्लेवाडासारख्या अतिदुर्गम गावांत जिथे पेट्रोलपंपसुद्धा नाही. पेट्रोल सहज उपलब्ध होत नाही, तेथे असे कृत्य झाल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. चांदेकर यांचे कुणाशी शत्रुत्व होते का, कुणाशी भांडण झाले होते का, संबंधितांचा त्यांचा प्राण घेण्याचा उद्देश होता का, हा चोरी, दरोड्याचा प्रकार आहे की, हा गाव नक्षलग्रस्त असल्यामुळे येथे नक्षलवादाचे काही धागेदोरे आहेत, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. पोलिसांच्या अधिक तपासानंतर या मागील कारणे स्पष्ट होतील.