ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ४ : अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा गावात १ जून रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घराच्या अंगणात झोपलेल्या चरणदास गजानन चांदेकर (वय ४८) रा. छल्लेवाडा यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी तक्रार दाखल होताच रेपनपल्ली पोलिसांनी कौशल्याने तपास करत या प्रकरणाचे रहस्य उलगडले. व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला सोमवारी ३ जून रोजी अटक केली. हरीदास मुंजमकर (वय ४६) रा. छल्लेवाडा,असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छल्लेवाडा येथे आरोपी हरिदास मुंजमकर हा डीजे आणि मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करीत होता. दरम्यान चरणदास चांदेकर यांनीही याच गावात डीजे आणि मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. एकाच गावातच दोन व्यवसाय झाल्याने हरीदासच्या व्यवसायावर विपरीत परीणाम होऊ लागला. त्याचा नफा कमी झाल्याने तो संतप्त झाला होता. याच व्यावसायिक स्पर्धेतून आणि इर्षेतून संतापलेल्या हरिदासने टोकाचा निर्णय घेत थेट चरणदास चांदेकर यांच्या हत्येचा कट रचला. शनिवारी रात्री चरणदास चांदेकर घराच्या अंगणात गाढ झोपेत असताना हरीदासने त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चरणदास गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, रेपनपल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा अतिशय कौशल्याने तपास करून आरोपी हरिदास मुंजमकर याला अटक केली. छल्लेवाडासारख्या अतिदुर्गम भागांत अशा प्रकारे पेट्रोल टाकून पेटवण्याची ही घटना दुर्मिळ होती. याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पण अखेर सर्व तर्कवितर्कांना विराम मिळाला असून या प्रकरणाचे रहस्य पोलिसांनी उलगडले आहे.









