ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ४ :गडचिरोली-चिमूर लोकसभेचा निकाल मंगळवार ४ जून रोजी जाहीर झाला असून अनपेक्षितपणे मुसंडी मारत काॅंग्रेसचे डाॅ. नामदेव किरसान यांनी तब्बल 141696 मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. या मतदार संघात सलग दोनदा निवडून आलेला भाजपचे अशोक नेते यांचा त्यांनी दारूण पराभव केला.
ही निवडणूक अतिशय अटीतटीची होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज असताना हा अंदाज चुकवत डाॅ. नामदेव किरसान यांनी अशोक नेते यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. या निवडणूकीत काॅंग्रेसचे उमदेवार डाॅ. नामदेव किरसान यांना 617792, भाजपचे अशोक नेते यांना 476096 मते मिळाली. तृतीय स्थानी असलेले बहुजन समाज पार्टीचे योगेश गोन्नाडे यांना फक्त 19055 मते मिळाली. मुळचे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोविंदपुरचे असलेले डाॅ. नामदेव किरसान नवखे उमेदवार असल्याचे भाजपने गृहित धरले. पण त्यांनी मागील पाच वर्षांपासूनच आपला जनसंपर्क वाढवला होता. शिवाय काॅंग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपले पूर्ण राजकीय कौशल्य पणाला लावत डाॅ. किरसान यांचा विजय खेचून आणला. तसेच काॅंग्रेसचे तरुण व उत्साही जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केलेली पक्षबांधणी, डाॅ. किरसान यांच्यासोबत राहून केलेले कार्य अखेर काॅंग्रेसला विजयाचा आनंद मिळवणारे ठरले. डाॅ. नामदेव किरसान विजयी होताच काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आनंद साजरा केला. दुसरीकडे पराभूत उमेदवार अशोक नेते यांचे निवासस्थान व जनसंपर्क कार्यालयात शुकशुकाट होता. तब्बल दहा वर्षांनी काॅंग्रेसला आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवता आला. त्यामुळे आता काॅंग्रेसची ताकद आणि उत्साह दोन्ही वाढला आहे.









