इंद्रावती नदीच्या काठी छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांची माओवाद्यांशी चकमक

117

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ५ : इंद्रावती नदीच्या काठावरील छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांची बुधवार ५ जून २०२४ रोजी सकाळी माओवाद्यांशी जबरदस्त चकमक झाली. मात्र घनदाट जंगलाचा फायदा घेत माओवादी पळून गेले असून पोलिसांनी त्यांचे साहित्य जप्त केले आहे.

अहेरी परीसरातील काही सशस्त्र माओवादी गडचिरोलीत तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावण्यासाठी व त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने दाखल झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. इंद्रावती नदीच्या काठावरील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील परिसराचा शोध घेण्यासाठी अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात तत्काळ सी-६० कमांडोंच्या पथकाने शोध अभियान सुरू केले. बुधवारी सकाळी देचलीपेठा पोलिस स्टेशनअंतर्गत ग्यारेवाडा गावाजवळ इंद्रावती काठावर शोध घेतला जात असताना माओवाद्यांनी पोलिस दलावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिस जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र घनदाट जंगलाचा फायदा घेत माओवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर परिसरात शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य, स्फोटके, वायर, बॅटरी आणि काही पिट्टू जप्त करण्यात आले. या परिसरात आणखी शोध सुरू असून माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.