धान खरेदी अपहार प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक

183

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ८ : गडचिरोली जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२३ या दरम्यान झालेल्या अपहार प्रकरणात यापुर्वी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांना १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणाच्या तपासात ६ जून रोजी राकेश सहदेव मडावी (वय ३४) व्यवसाय – नोकरी (प्रतवारीकार तथा विपनन निरीक्षक आदिवासी विकास महामंडळ, घोट) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करून न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय, चामोर्शी येथे हजर केले असता न्यायालयाने त्यालाही १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण धान खरेदी घोटाळ्याशी संबंधित असल्याने आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरिक्षक राहुल आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक सरीता मरकाम तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अंमलदारांनी केली.